‘पितांबरी सांस्कृतिक मंचा’च्या वतीने ‘कॉर्पोरेट कीर्तन’ कार्यक्रमाचे आयोजन !

ठाणे – श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून ‘पितांबरी सांस्कृतिक मंचा’च्या वतीने सुप्रसिद्ध समर्थ साहित्य अभ्यासक श्री. समीर लिमये यांचे ‘कॉर्पोरेट कीर्तन’ आयोजित करण्यात आले होते. राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे हा कार्यक्रम पार पडला. ‘कॉर्पोरेट कीर्तना’चा हा २०० वा प्रयोग होता. राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामींचे विचार आजच्या ‘कॉर्पोरेट’ युगातही कसे तंतोतंत लागू होतात, याचे दर्शन श्री. समीर लिमये यांनी अतिशय सहजपणे घडवले. ‘मनाचे श्लोक हा केवळ लहान मुलांच्या पाठांतराचा विषय नसून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरणारे ज्ञान आहे’, असेही श्री. लिमये यांनी सांगितले.

पारंपरिक कीर्तनाचे स्वरूप आणि त्यासह आताच्या काळातील ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’ची जोड असा जुन्या-नव्याचा उत्तम मिलाप साधल्यामुळे श्री. लिमये यांनी मांडलेले विचार श्रोत्यांपर्यत अतिशय प्रभावीपणे पोचले. श्री. स्नेहल धामापूरकर यांनी त्यांना तबल्यावर, तर श्री. सुधांशु घारपुरे यांनी संवादिनीवर साथ दिली. या कार्यक्रमाची निर्मिती सौ. धनश्री नानिवडेकर यांनी केली होती.

‘पितांबरी सांस्कृतिक मंचा’ची संकल्पना विशद करतांना पितांबरीचे व्यस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले, ‘‘अभिनव उत्पादनांची निर्मिती आणि विविध दर्जेदार कार्यक्रमांचे प्रायोजक’ अशी पितांबरीची ओळख आहेच; परंतु सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक असे विविध विषय लोकांसमोर मांडता यावेत, यासाठी ‘पितांबरी सांस्कृतिक मंच’ हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. या अंतर्गत यापुढील काळात अशाच दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.’’

या प्रसंगी प्रा. अशोक चिटणीस यांनी ‘समर्थ रामदासस्वामींचे विचार तरुण पिढीसमोर प्रकर्षाने येण्याची आवश्यकता आहे’, असे सांगून अशा स्तुत्य उपक्रमाविषयी पितांबरीला धन्यवाद दिले. ठाण्यातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.