दोडामार्ग तालुक्याचा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रा’मध्ये समावेश करावा !

कळणे येथे झालेल्या पर्यावरणप्रेमींच्या बैठकीत मागणी

दोडामार्ग – दोडामार्ग तालुक्याचा समावेश ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रा’मध्ये (‘इको सेन्सिटीव्ह झोन’मध्ये) समावेश करण्यात यावा, यासाठी अधिकाधिक नागरिकांनी ई-मेल, तसेच पत्र यांद्वारे मागणी करावी, असे आवाहन कळणे येथे झालेल्या पर्यावरणप्रेमींच्या बैठकीत करण्यात आले.

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या स्वयंसेवी संस्थेने कळणे येथे या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, कुडाळचे अधिवक्ता सुहास सावंत, आडाळीचे ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी लळीत यांनी अधिसूचनेविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी ते म्हणाले, ‘‘प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेच्या मसुद्यात दोडामार्ग तालुक्यातील एकाही गावाचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून झालेला नाही. दोडामार्ग तालुका पर्यावरणदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे. असे असले, तरी तालुक्यात खाणकाम आणि जंगलतोड होत आहे. तालुक्यात रबर आणि अननस यांच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. त्यामुळे या भागातील जैवविविधता, प्राण्यांचा अधिवास आणि एकंदरच पर्यावरण धोक्यात आले आहे. हे सर्व जपण्यासाठी हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित होणे आवश्यक आहे. हा संपूर्ण भाग खाणमाफियांना आंदण देण्यासाठीच तो पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यात आला आहे. माधव गाडगीळ समितीनेही तिच्या अहवालात ‘हा तालुका पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करावा’, अशी शिफारस केली होती; मात्र हा अहवाल फेटाळण्यात आला. त्यानंतर नेमलेल्या दुसर्‍या कस्तुरीरंगन समितीने हा भाग वगळण्याची घातक शिफारस केली. (अशा प्रकारे सोयीनुसार अहवाल देणार्‍या समित्या स्थापन करून पर्यावरणाची हानी करणारा तथाकथित विकास सरकारला साध्य करायचा आहे का ? – संपादक) केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने ६ जुलै या दिवशी घोषित केलेल्या पश्चिम घाटातील ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ अधिसूचनेत जिल्ह्यातील सर्वांत अधिक जैवविविधतेने संपन्न असलेल्या दोडामार्ग तालुक्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे या तालुक्यावर लोहखनिजासह अन्य खाण व्यवसायांचे संकट येऊ शकते.’’ (यापूर्वीही तालुक्यातील कळणे येथे जनतेच्या मोठ्या विरोधानंतरही खनिज उत्खनन चालू करण्यात आले. त्याचे दुष्परिणाम आता जनता भोगत आहे. हे लक्षात घेऊन तरी तालुक्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्याचा संवेदनशील क्षेत्रात समावेश झाला पाहिजे ! – संपादक)