बँकांच्या तपासणीतच आढळल्या दोन सहस्र रुपयांच्या १३ सहस्र ६०४ बनावट नोटा !

नवी देहली – केंद्रशासनाने संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सादर केलेल्या माहितीनुसार वर्ष २०२१-२०२२ मध्ये बँकांच्या स्वत:च्या तपासणीत २ सहस्र रुपयांच्या १३ सहस्र ६०४ बनावट नोटा सापडल्या. या तुलनेत वर्ष २०१८-१९ आणि २०२०-२१ या कालावधीत हे प्रमाण अल्प होते, असा दावा शासनाने केला आहे. दुसरीकडे ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’च्या तपशीलानुसार वर्ष २०१८ ते २०२० या कालावधीत देशात पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. वर्ष २०१८ मध्ये ५४ सहस्र ७७६, वर्ष २०१९ मध्ये ९० सहस्र ५६६, तर वर्ष २०२० मध्ये २ लाख ४४ सहस्र ८३४ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदी केल्यानंतर सरकारने २ सहस्र रुपयांची नवी नोट चलनात आणली होती; मात्र त्याच्याही बनावट नोटा सिद्ध करण्यात आल्याचे बँकांच्याच तपासणीत निदर्शनास आले आहे. बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी सरकारने कायदा केला आहे. अन्वेषण यंत्रणाच्या साहाय्यानेही शोध घेतला जातो.

संपादकीय भूमिका

बनावट नोटा रोखण्यासाठी प्रयत्न करूनही त्या भारताच्या चलनात सापडणे, हे यंत्रणांना लज्जास्पद !