‘वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांवर पुष्कळ त्रासदायक आवरण येते. ते नियमित काढणे आवश्यक असते. आवरण काढल्याने साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होतो. मिरज आश्रमातील सौ. अंजली अजय जोशी (वय ५९ वर्षे) या गेल्या २ वर्षांपासून सनातनच्या सात्त्विक उदबत्तीने स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढत आहेत. त्याचा त्यांना चांगला लाभ होत आहे. या पद्धतीच्या संदर्भात मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारले. त्यात त्यांनी काही पालट सांगितले. त्याप्रमाणे साधकांसाठी ‘उदबत्तीने आवरण काढण्याची’ पद्धत येथे दिली आहे.
१. उदबत्ती कशी फिरवावी ?
आवरण काढतांना न पेटलेली सनातनची सात्त्विक उदबत्ती वापरावी. ती आपल्या ज्या चक्रावरून आवरण काढायचे आहे, त्याच्यावरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने अशा दोन्ही बाजूंनी ३ वेळा फिरवावी. आवरण काढण्यासाठी उदबत्ती शरिराच्या चक्रस्थानी शरिरापासून ३ – ४ सें.मी. अंतरावर धरावी आणि ती उभी किंवा आडवी, जशी सोयिस्कर होईल अशी धरू शकतो.
२. आवरण काढावयाचे चक्र आणि त्या वेळी करायचा नामजप
टीप १ – आज्ञाचक्रावरील आवरण काढतांना दोन डोळ्यांच्या आतीलही आवरण निघून जावे, यासाठी डोळे उघडे ठेवावेत.
टीप २ – अनाहतचक्रावर उदबत्ती फिरवून झाल्यावर पोटावरून ‘श्री पञ्चमहाभूतेभ्यो नमः ।’ हा नामजप करत (सूत्र १ मध्ये दिल्याप्रमाणे) उदबत्ती फिरवावी.
त्यानंतर संपूर्ण शरिराचे डोक्यापासून पायांपर्यंत तीनदा आवरण काढावे. तेव्हा उदबत्ती डोक्यापासून पायांपर्यंत सरळ रेषेत तीनदा फिरवावी आणि त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म’, असे म्हणावे.
३. आवरण काढल्याने झालेले लाभ
या पद्धतीने उदबत्तीने आवरण काढण्यास २ ते ३ मिनिटेच लागतात. या पद्धतीचा साधकांवर होणारा परिणाम बघितला, तर बर्याच जणांवरील आवरण लगेच दूर झाल्याचे लक्षात आले. साधकांना हलकेपणा जाणवून उत्साह वाटला आणि आनंद मिळाला. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या एका साधकाचा त्रास उणावला. त्यामुळे आवरण काढण्याची ही पद्धत उत्तम आहे.
४. दुसर्यावरील आवरणही काढता येणे शक्य असणे
ज्याप्रमाणे आपण दुसर्यासाठी उपाय करतो, त्याप्रमाणे दुसर्या साधकावरील आवरणही आपण या पद्धतीने काढू शकतो. साधक नसेल तेव्हा त्या साधकाचे स्मरण करून त्याच्याऐवजी स्वतःच्या चक्रांवरील आवरण उदबत्तीने काढावे.
५. आवरण काढतांना घ्यायची काळजी
अ. आवरण भावपूर्ण काढावे.
आ. उदबत्तीचा वापर झाल्यानंतर ती प्लास्टिक पिशवीत ठेवून भारित होण्यासाठी सनातनच्या ग्रंथात ठेवावी.
इ. उदबत्ती आवश्यकतेनुसार पालटावी.
ई. त्रासाच्या तीव्रतेनुसार प्रत्येक १ घंट्याने किंवा आवश्यकता वाटेल तेव्हा या पद्धतीने आवरण काढावे.
६. पेटलेल्या उदबत्तीने आवरण काढण्यापेक्षा न पेटलेल्या उदबत्तीने आवरण काढणे अधिक प्रभावी असल्याचे लक्षात येणे
सौ. अंजली जोशी (पत्नी) दोन वर्षांपासून पेटलेली उदबत्ती वापरून या पद्धतीने आवरण काढत होती. ती पद्धत मी काही तीव्र त्रास असलेल्या साधकांना सांगितल्यावर त्यांचे २० – ३० टक्के आवरण निघत असे. मी ही पद्धत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी न पेटलेल्या उदबत्तीने आवरण काढण्याचा प्रयोग करण्यास सांगितला. तीव्र त्रास असलेल्या एका साधकाचे पेटलेल्या उदबत्तीने ३० टक्के आवरण निघत होते. त्याने न पेटलेल्या उदबत्तीचा प्रयोग केल्यावर त्याचे ३५ टक्क्यापर्यंत आवरण निघाल्याचे त्याच्या लक्षात आले. तसेच न पेटलेल्या उदबत्तीने आवरण काढल्यावर काही साधकांना आज्ञाचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवू लागल्या. ‘न पेटलेली उदबत्ती निर्गुण स्तरावर कार्य करत असल्याने तिने आवरण काढल्यास ते ५ टक्क्यांनी अधिक प्रमाणात निघते’, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ‘साधकांनी साधनेतील एखादी नवीन पद्धत शोधून काढली, तरी ती उन्नतांना एकदा दाखवल्यास तिचा अधिक लाभ होतो’, हे मला यातून शिकायला मिळाले.
श्री गुरूंनीच आमच्याकडून आवरण काढण्याचे प्रयत्न करून घेतले. समष्टीला त्याचा लाभ होण्याच्या उद्देशाने त्यांनी मला ‘अभ्यास कसा करायचा ?’, हे शिकवले. त्यांच्याच कृपेने मी हे लिखाण करू शकलो. याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६६ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा.(१९.६.२०२२)
|