मुंबईकरांच्या मनातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

मुंबई, २० ऑगस्ट (वार्ता.) – मुंबईकरांच्या मनातील मुंबईसाठीचे स्वप्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. ते पूर्ण करायचे दायित्व आपले आहे; कारण त्यांचे नाव सांगून जे निवडून आले, त्यांनी त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. या मुंबईकराकडे त्यांनी कधीही बघितले नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणार्‍यांना आपण निवडून आणायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये २० ऑगस्ट या दिवशी मुंबई येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात नवनिर्वाचित मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अधिवक्ता आशिष शेलार, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपचे आजी-माजी खासदार आणि आमदार उपस्थित होते.

आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला मेट्रो दिली. मुंबईमध्ये ५२ पूल केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. मुंबई येथे बुलेट ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिली. कोस्टल रोडची अनुमती आणि मुहूर्तमेढ देवेंद्र फडणवीस सरकारने रोवली. मिठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अर्धा निधी केंद्र सरकारने दिला.’’