हवाई वाहतूक मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक होणार ! – खासदार रणजितसिंह निंबाळकर

पंढरपूर येथे ‘किसान विमानतळ’ उभे करण्याची मागणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे देशातील पहिले ‘किसान विमानतळ’  उभे करावे, अशी मागणी माढा येथील भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे. पंढरपूर शहर हे सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून येथे देशभरातून कोट्यवधी भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. हा परिसर बागायत असल्याने डाळिंब, द्राक्षे, केळी, बेदाणे यांच्यासह ताज्या भाज्या येथून देशभर जलदगतीने वितरित करणे सोपे होते. यादृष्टीने पंढरपूर येथे विमानतळ उभे करण्याची मागणी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला केली होती. त्यानुसार पुढील मासामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमवेत बैठक होणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

सरकारने शेतकर्‍यांसाठी चालू केलेली ‘किसान रेल्वे’ मागील काही मासांपासून बंद आहे. या रेल्वेसाठी अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून ५० टक्के अनुदान दिले जात होते. त्याची समयमर्यादा संपल्याने ही रेल्वे बंद असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली. समयमर्यादा वाढवण्यासाठी पुरवणी मागण्यांत ‘आर्थिक नियोजन करावे’, अशी मागणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.