ठार मारण्याची धमकी मिळाल्याने समीर वानखेडे यांची तक्रार !

समीर वानखेडे

मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘ट्विटर’ वरून जीवे मारण्याची धमकी आल्याच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. धमकी देण्याच्या दिवशीच ट्विटर खाते चालू करण्यात आले असून त्यानंतर ते बंद करण्यात आल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.

काही मासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुसलमान असून त्यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला होता. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केलेल्या पडताळणीमध्ये वानखेडे ‘हिंदु’ असल्याचे नमूद केले आहे. यानंतर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात अपकीर्ती केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीनंतर ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याचे वानखेडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.