राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान देण्याविषयी २३ ऑगस्टला बैठक घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

विधान परिषद प्रश्नोत्तरे…

मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान देण्याविषयी यापूर्वीच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाची कार्यवाही करण्यात येईल, तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. विनाअनुदानित शाळांना २० टक्के वाढीव अनुदान देण्याविषयी लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी मागणी करत आहेत. याचा विचार करून २३ ऑगस्ट या दिवशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १८ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत दिली. सदस्य विक्रम काळे यांनी हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या वेळी विचारला होता. त्यावरील चर्चेत सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, कपिल पाटील, अनिल परब, जयंत पाटील यांनी भाग घेतला.