चातुर्मास

या लेखात आपण चातुर्मासाचे महत्त्व आणि या मासांविषयी माहिती पहाणार आहोत.

१. चातुर्मास कालावधी आणि महत्त्व

१ अ. चातुर्मास कालावधी : ‘चातुर्मास’, म्हणजे ‘४ मासांचा काळ.’ याचा आरंभ ‘देवशयनी’, म्हणजेच आषाढ शुक्ल ११ (एकादशी) या दिवशी होतो आणि ‘प्रबोधिनी’, म्हणजेच कार्तिक शुक्ल ११ (एकादशी) या दिवशी संपतो. या दोन्ही ‘महाएकादशी’ असून अनेक जण या दिवशी उपवास करतात. एकादशीला आळंदीची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाते. पालखीच्या समवेत लक्षावधी वारकरी असतात.

१ आ. चातुर्मासात ‘देवशयनी’ एकादशीच्या दिवशी देव झोपत असल्याने असुरांपासून रक्षण होण्यासाठी त्या कालावधीत व्रत-वैकल्ये केली जाणे : आषाढ मासाच्या पौर्णिमेच्या मागेपुढे ‘पूर्वाषाढा-उत्तराषाढा’ नक्षत्र असते. मनुष्याचे १ वर्ष, म्हणजे देवांची अहोरात्र. ‘दक्षिणायन’ म्हणजे ६ मासांची ‘रात्र’, तर उत्तरायण म्हणजे ‘दिवस’ होय. ‘यथा देहे तथा देवे’, म्हणजे मानवाने ‘आपल्यासारखेच देव आहेत’, ही कल्पना गृहीत धरल्यामुळे आपल्यासारखेच देव झोपी जातात; म्हणून आरंभ ‘देवशयनी’ एकादशीने होतो आणि ४ मासांनी कार्तिक शुक्ल ११, म्हणजेच ‘प्रबोधिनी’ एकादशीच्या दिवशी ‘देव जागे होतात’, असे समजले जाते.

देव निद्रिस्त असल्यामुळे अनेक असुर मानवाला त्रास देतात. हे त्रास टाळण्याकरता व्रत-वैकल्ये करावीत, म्हणजे धर्माची अभिवृद्धी होऊन मानवाला त्याचा लाभ होतो आणि त्याच्यात संकटाला तोंड देण्याची मानसिकता निर्माण होते.

२. चातुर्मासातील व्रतांचे महत्त्व

२ अ. व्याख्या : ‘व्रत’, म्हणजे विशिष्ट काळासाठी किंवा आमरण आचरायचा धर्म. ‘नियम’ आणि ‘व्रत’ हे समानार्थी शब्द आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा आचार, अन्नादी व्यवहार, रूढी आणि उपासना यांवर निर्बंध घालते किंवा घालून घेते, त्या वेळी या गोष्टी ‘व्रत’ या संज्ञेत येतात.

२ आ. व्रतांचे प्रकार आणि नियम : व्रते ‘नित्य’ (नेहमी करायची) आणि ‘काम्य’ (इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी केलेली) अशा दोन्ही प्रकारची असतात. एकादशीचा उपवास करणार्‍याने संपूर्ण दिवस ‘अन्न वर्ज्य करणे, एकदाच पाणी पिणे आणि दिवसा न झोपणे’, असे नियम पाळावेत. एकादशीचे पारणे (उपवास सोडणे) द्वादशीला किंवा दुसर्‍या दिवशीही उपवास आल्यास त्रयोदशीला करता येते.

व्रत करणार्‍यांनी मद्य-मांसादी पदार्थांचे सेवन न करणे, पलंगावर न निजणे आदी निर्बंध पाळावयाचे असतात.

३. चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव

३ अ. श्रावण मास

३ अ १. माहिती : चातुर्मासाचा दुसरा मास श्रावण मास आहे. या मासातील पौर्णिमेच्या मागेपुढे ‘श्रवण’ नक्षत्र येते; म्हणून हा श्रावण मास आहे. या मासात स्त्रियांची अनेक व्रत-वैकल्ये असून सातही वारांना काही ना काही पूजा सांगितल्या आहेत.

३ अ २. नवविवाहित स्त्रियांनी ५ वर्षे पाळावयाची व्रते आणि वारानुसार करायची पूजा

अ. सोमवारी शिवपूजा : यामध्ये अनुक्रमे तांदूळ, तीळ, मूग आणि जवस या धान्यांची शिवामूठ वाहिली जाते.

आ. सोळा सोमवार व्रत : सोमवती व्रत हे ‘काम्य’ (इच्छा) व्रत आहे.

इ. मंगळवारी मंगळागौरीची पूजा : नवविवाहित मुली सौभाग्यवृद्धीसाठी मंगळवारी मंगळागौरीची षोडशोपचारे पूजा करतात. यात १६ या संख्येला महत्त्व असते. त्यामुळे पूजेसाठी १६ सुवासिनींना बोलावतात, तसेच पूजा करतांना देवीला १६ प्रकारची पत्री, फुले इत्यादी वहातात.

ई. बुधवार आणि गुरुवार : या दोन्ही दिवशी बृहस्पतीची पूजा करतात.

उ. शुक्रवारी जिवतीची पूजा : या दिवशी मुलांच्या आरोग्याकरता जिवतीच्या चित्राची पूजा करतात. सुवासिनींना हळदकुंकू लावून फुटाणे देतात.

ऊ. शनिवार : नरसिंह आणि पिंपळ यांची पूजा करतात.

ए. रविवार : सूर्याची (आदित्यराणूबाईची) पूजा करतात.

३ अ ३. श्रावण मासातील दुसर्‍या पंधरवड्यातील व्रते

अ. ‘जन्माष्टमी’ : या दिवशी श्रीकृष्ण जयंती असते. कृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. या दिवशी संत ज्ञानेश्वर जयंती असते.

आ. श्रावण कृष्ण द्वादशी : या दिवशी पावस (जिल्हा रत्नागिरी) येथील स्वामी स्वरूपानंद यांची पुण्यतिथी असते.

४. दर्श (पिठोरी) अमावास्या : या दिवशी पोळा सण साजरा करतात. या दिवशी वृषभपूजन केले जाते. वृषभांना (बैलांना) गोड-धोड खाऊ घालतात. हा सण ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.’ (क्रमशः)

– आ.म. वझे, पुणे

(साभार : ‘आदिमाता’, जुलै २००५)