‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’, या भजनाच्या माध्यमातून आंतरिक गोपाळकाल्याची संतांनी सांगितलेली महती आणि त्याची आध्यात्मिक प्रकिया

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’, या भजनाच्या माध्यमातून संतांनी आंतरिक गोपाळकाल्याची महती विशद करून ठेवली आहे. या भजनाच्या माध्यमातून ‘दशइंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपालकला होत असे ।।’, असे सांगितले आहे. याचा अर्थ वेगवेगळ्या इंद्रियांचा, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये आपापल्या विषयानुसार द्वैतभावात किंवा अनेकात कार्यरत रहातात; परंतु ‘दशइंद्रियाचा गोपाळकाला’ या संबोधनातून पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांचा केंद्रबिंदू जेव्हा एक परमात्मा होतो, तेव्हा एका प्रकारे पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेंद्रिये ध्येयरूपाने एक होतात आणि यालाच ‘आंतरिक गोपालकाला’, असे संबोधले आहे. इंद्रियांची एकत्वाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर जितेंद्रिय अवस्थेत जीवरूपी बंदिस्त घट फुटून परमात्मारूपी घटाशी एकरूप होतो. ‘ही आंतरिक दहीहंडीची अवस्था इंद्रियांच्या गोपाळकाल्याची स्थिती बाह्य दहीहंडी फोडण्यापूर्वी प्राप्त करणे आवश्यक आहे’, हे साधकांनी समजून घेतले पाहिजे. हा या दहीहंडी फोडण्याच्या उत्सवाचा संकेत आहे.’

– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (१४.९.२०१७)