नम्र आणि गुरूंप्रती भाव असणारे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१. श्री. गिरिजय प्रभुदेसाई (तबला विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

१ अ. अल्प अहं

‘श्री. योगेश सोवनी यांना तबल्याविषयी बरेच ज्ञान आहे. त्यांना १४० कायद्यांविषयी (टीप) माहिती आहे; पण त्यांच्या बोलण्यातून तसे कुठेही जाणवले नाही. त्यांचे तबलावादन झाल्यावर प्रत्येक वेळी ‘वाजवलेले व्यवस्थित ऐकू येत होते ना ?’, असे ते मला विचारत होते. यातून त्यांचा अहं अल्प असल्याचे मला जाणवले.

टीप – तालाच्या मूळ स्वरूपानुसार सिद्ध केलेली विशिष्ट बोलसमुहाची नियमबद्ध रचना, म्हणजे कायदा.

श्री. योगेश सोवनी

१ आ. ‘तबला’ या वाद्याप्रती भाव

त्यांच्यात ‘तबला’ या वाद्याप्रती पुष्कळ भाव जाणवला. तबलावादन करतांना ‘देवाची पूजा करत आहोत’, असा त्यांचा भाव असतो. ते म्हणतात, ‘‘मी तबल्याविना राहू शकत नाही.’’ यावरून ‘तबलावादन’ हे त्यांचे सर्वस्व आहे’, हे लक्षात येते.

१ इ. गुरूंवर अपार श्रद्धा असणे

ते उस्ताद झाकीर हुसेन यांचे शिष्य आहेत. ते गुरूंकडून शिष्यभावाने विद्या ग्रहण करतात. त्यांच्या बोलण्यातून त्यांचे गुरु उस्ताद झाकीर हुसेन आणि अन्य गुरुजन यांच्याविषयी अपार श्रद्धा जाणवली.’

२. कु. किरण व्हटकर (वय २० वर्षे), गोवा.

अ. ‘एकदा ते दुपारी महाप्रसाद ग्रहण करत होते. तेव्हा एक भांडे खाली पडले आणि त्याचा आवाज झाला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘हा नाद तबल्याच्या नादासारखाच आहे.’’ त्यानंतर त्यांनी त्या नादावर तबल्याचे बोल म्हटले.

आ. त्यांचे हसणे तबल्याच्या नादासारखेच आहे. त्यांचे हसणे ऐकल्यावर मला तबलावादनाची आठवण होते. त्यांच्या हसण्यातून उत्साह आणि आनंद यांची पुष्कळ स्पंदने जाणवतात.’

३. कु. किरण व्हटकर, श्री. गिरिजय प्रभुदेसाई (तबला विशारद) आणि सौ. अनघा शशांक जोशी (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), गोवा.

३ अ. ‘श्री. सोवनी सकाळी ज्या उत्साहाने तबलावादन करायचे, त्याच उत्साहाने रात्रीही तबलावादन करायचे.

३ आ. नम्र

त्यांना तबलावादनाचा अनुभव अधिक असूनही ते सगळ्यांशी नम्रतेने बोलत होते. ‘ते मोठे कलाकार आहेत’, असे त्यांच्या वागण्यातून कुठेही जाणवले नाही.

३ इ. अल्प कालावधीत जवळीक साधणे

ते आणि त्यांच्या पत्नी २ दिवस गोव्यात वास्तव्यास असतांना त्यांनी आम्हा सर्वांशी जवळीक साधली. त्यांनी आम्हाला आवर्जून मुंबई येथील त्यांच्या घरी रहायला बोलावले.

३ ई. त्यांचे वागणे आणि बोलणे यांतून त्यांच्यातील निरागसभाव जाणवला.

३ उ. गुरूंप्रतीचा भाव

ते उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद अल्लारख्खाँ साहेब, पं. सुधीर माईणकर इत्यादी मान्यवर कलाकारांकडे तबलावादन शिकत असतांना त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ते त्याविषयी सांगत असतांना ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटत होते.

३ ऊ. त्यांच्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव जाणवला.’

गुरूंकडे बाह्यांगाने न पहाता त्यांनी सांगितलेले साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक !

‘तबलावादक श्री. योगेश सोवनी म्हणतात, ‘‘गुरु महान असतात. त्यामुळे गुरूंचे अनुकरण करण्यापेक्षा गुरूंनी दिलेल्या विद्येशी प्रामाणिक राहून प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. गुरूंचे वागणे, बोलणे, वेशभूषा, केशरचना इत्यादींचे अनुकरण करण्यापेक्षा ‘ते गुरुपदापर्यंत कसे आले ?’, ते शिकण्याचा ध्यास ठेवला, तर आपण गुरूंनी दिलेली विद्या चांगल्या प्रकारे आत्मसात् करू शकतो.’’

– तबलावादक श्री. योगेश सोवनी (संगीत अलंकार (तबला)), डोंबिवली, जिल्हा ठाणे.