स्वातंत्र्यदिनी उत्तरप्रदेशमधील लक्ष्मणपुरी आणि प्रयागराज येथे हिंसाचार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनी येथील बंगला बाजार भागात काही जणांनी तिरंगा यात्रा काढली होती. या वेळी त्यांचा दुसर्‍या गटाशी वाद झाला. शाब्दिक चकमकीचे मारहाण आणि दगडफेक यांत रूपांतर झाले. दुसरी घटना प्रयागराज येथील आहे. येथे तिरंगा यात्रेत ‘डीजे’ (मोठी ध्वीक्षेपक यंत्रणा) लावणार्‍या तरुणावर गोळीबार करण्यात आला. ही घटना घूरपूर गावातील आहे. तरुणाला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.

लक्ष्मणपुरीध्ये स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेली तिरंगा यात्रा येथील आशियानातील बंगला बाजार भागातील श्री चंद्रिकादेवी मंदिरासमोर आली असता एकाच समुदायातील दोन गटांमध्ये संघर्ष झाला. या वेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत दुकाने आणि घरे यांची मोठी हानी झाली. पोलिसांनी ही घटना जुन्या वादातून घडल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी अनेकांना कह्यात घेण्यात आले आहे, तर ९ जणांसह १४ अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रयागराज येथे तिरंगा यात्रा काढतांना किरकोळ कारणावरून ‘डीजे’ चालक आणि तिरंगा यात्रेत सहभागी झालेले २ तरुण यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर एका तरुणाने ‘डीजे’ लावणार्‍यावर गोळीबार केला. त्यात तरुण गंभीर घायाळ झाला. घायाळ झालेल्याचे नाव मनोज कुमार पटेल, तर गोळीबार करणाचे नाव नीरज कुमार निषाद आहे. पोलिसांनी नीरजला अटक केली आहे.