गुजरातच्या धर्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर (जिल्हा नाशिक) येथे स्मारक उभारावे ! – सावरकरप्रेमींची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकर

नाशिक – भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथे सावरकर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी भगूरकर आणि सावरकरप्रेमी यांनी १३ ऑगस्ट या दिवशी केली. (अशी मागणी का करावी लागते ? शासन स्वतः लक्ष घालून कृती का करत नाही ? – संपादक)

‘स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याविना पर्याय नाही’, हे ठासून सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिकचे भूषण आहेत. एकाच वेळी २ जन्मठेपेच्या शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे क्रांतीसूर्य स्वा. सावरकर स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा होते. भगूर येथे सावरकरांचे स्मारक आहे. हे स्मारक सावरकरांचे आधीचे निवासस्थान होते. आता हे स्मारक पुरातत्व विभागाच्या कह्यात आहे. या स्मारकात सावरकरांच्या अनेक आठवणी आजही पहायला मिळतात. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’ ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे भारताच्या इतिहासातील सुवर्णपान आहे.