कोरोनामुळे चीनमधून परतलेल्या २० सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा व्हिसा देण्यास चीनचा नकार !

बीजिंग (चीन) – चीनमध्ये शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी कोरोनामुळे भारतात परतले होते. आता त्यांना पुन्हा शिक्षणासाठी चीनमध्ये जायचे आहे; मात्र चीन त्यांना व्हिसा देण्यास विविध कारणे सांगून नकार देत आहे. जवळपास २० सहस्र विद्यार्थी चीनला जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी या विषयावर चर्चाही केली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना चीनमध्ये पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर चीनने तेथील भारतीय दूतावासाकडे विद्यार्थ्यांची सूचीही मागितली होती; मात्र नंतर केवळ आवश्यकता असलेल्यांची सूची देण्यास सांगितले. ती सूची दिल्यानंतरही चीन विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यास टाळाटाळ करत आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, सीमेवरील तणाव संपवण्याच्या दृष्टीने चीन या विद्यार्थ्यांचा वापर करत आहे. सार्वजनिकरित्या चिनी प्रवक्त्याने सांगितले, ‘विद्यार्थ्यांच्या परतीसाठी दोन्ही सरकारे सल्लामसलत करत आहेत;’ मात्र वास्तव हे आहे की, चीन एकांगी पद्धतीने परतीची प्रक्रिया ठरवत आहे. मागील मासातच चीन सरकारने ‘संबंधित विद्यापिठांच्या विद्यार्थ्यांशी संपर्क करू’, असे सांगितले होते; परंतु प्रत्यक्षात असा कुठलाही संपर्क करण्यात आलेला नाही.

संपादकीय भूमिका

चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !