पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून जनतेला पाच संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन

भारताचा ७६ स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

नवी देहली – आपल्याला आपल्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. देश यापुढे ‘पंचप्राण’ आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची ‘विकसित राष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिला प्राण आहे. दुसरा प्राण गुलामीचा अंश बाहेर काढणे, हा आहे. गुलामीपासून मुक्ती मिळवायला हवी. तिसरा प्राण म्हणजे आपल्याला आपल्या वारशाप्रती गर्व असला पाहिजे. कालबाह्य गोष्टींना सोडून नव्या गोष्टी स्वीकारण्याचा आपला वारसा आहे. चौथा प्राण फार महत्त्वाचा आहे. हा प्राण म्हणजे एकता आणि एकजुटता होय. १३० कोटी जनतेमध्ये एकता हवी. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या स्वप्नासाठी एकजुटता हा चौथा प्राण आहे. पाचवा प्राण म्हणजे नागरिकांचे कर्तव्य, हा आहे. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचादेखील समावेश आहे. आगामी २५ वर्षांतील संकल्प पूर्ण करण्यासाठी ही फार महत्त्वाची ‘प्राणशक्ती’ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केले. या भाषणामध्ये ‘पीएम् समग्र स्वास्थ्य मिशन’ या नवीन नावाने ‘राष्ट्रीय आरोग्य अभियाना’च्या विस्ताराचाही त्यांनी उल्लेख केला, तसेच म. गांधी, नेहरू, सावरकर यांचेही त्यांनी स्मरण केले. तत्पूर्वी त्यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवला. या वेळी २१ तोफांची सलामीही देण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात मांडलेली काही महत्त्वाची सूत्रे

भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी लोकांनी साथ द्यावी !

भ्रष्टाचार्‍यांप्रती जोपर्यंत चीड निर्माण होणार नाही, तोपर्यत देशातील भ्रष्टाचार संपणार नाही. भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी लोकांनी साथ दिली पाहिजे, तसेच राजकारण आणि वेगवेगळ्या संस्था यांतील घराणेशाहीदेखील संपवली पाहिजे. भारतात काही लोक गरिबीशी लढत आहेत. काही लोकांकडे रहाण्यासाठी घर नाही, तर दुसरीकडे काही लोकांकडे चोरी केलेला माल लपवण्यासाठी जागा नाही. हे योग्य नाही. याच कारणामुळे आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचे आहे. आधारकार्ड, भ्रमणभाष संच या आधुनिक साधनांचा वापर करून आम्हाला चुकीच्या लोकांच्या हातात जाणारे २ लाख कोटी रुपये वाचवण्यात यश आले. मागील सरकारच्या कार्यकाळात जे लोक बँकांना लुटून पळून गेले, त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोकांना कारागृहात डांबले आहे. ज्या लोकांनी देशाला लुटले आहे, त्यांना ती लूट परत करावी लागेल, अशी स्थिती आम्ही निर्माण करत आहोत.

महिलांना अपमानित करणार्‍या गोष्टींतून मुक्त होऊया !

मुले आणि मुली समान असतील, तरच घरात एकतेचा पाया रचला जाऊ शकतो. स्त्री-पुरुष समानता ही एकतेची पहिली अट आहे. भारत हा एकतेचा मंत्र आहे. तथापि कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्यात विकृती निर्माण झाली आहे. आपण महिलांचा अपमान करतो. दैनंदिन जीवनात स्त्रियांना अपमानित करणार्‍या प्रत्येक गोष्टीतून निसर्गाच्या संस्काराने मुक्त होण्याचा संकल्प आज आपण करू शकतो.

स्वातंत्र्यप्रेमींची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचे दायित्व घ्या !

मला असे वाटते की, पुढील २५ वर्षांसाठी आपण आपल्या संकल्पांवर लक्ष केंद्रित केले पाहिजेत. वर्ष २०४७ मध्ये स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा स्वातंत्र्यप्रेमींची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचे दायित्व आपण घेतले पाहिजे.

..तरीही भारत पुढे जात राहिला !

‘१४ ऑगस्टला भारतानेही हृदयाच्या जखमा लक्षात ठेवून ‘फाळणी विभीषिका स्मृती दिन’ साजरा केला. देशवासियांच्या भारतावर असलेल्या प्रेमामुळे प्रत्येकाने सुख दुःख सहन केले. आमचा ७५ वर्षांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. सुख-दु:खाची सावली घिरट्या घालत आहे. अशा परिस्थितीतही आपल्या देशवासियांनी प्रयत्न केले आणि साध्य केले. शेकडो वर्षांच्या गुलामीमुळे खोल जखमा झाल्या आहेत. जेव्हा स्वातंत्र्य दिले जात होते, तेव्हा देशवासियांना घाबरवले जात होते. देश दुभंगण्याची भीती दाखवण्यात आली; पण हा हिंदुस्थान आहे. आम्ही अन्न संकटाचा सामना केला, युद्धाचे बळी ठरलो, आतंकवाद्यांचे आक्रमण, नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले, पण तरीही भारत पुढे जात राहिला.