पावसाच्या उघडीपीमुळे थोडा दिलासा; पंचगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीजवळ !

कोल्हापूर, ११ ऑगस्ट (वार्ता.) – कालपासून पावसाची उघडीप झाल्यामुळे कोल्हापूरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे; मात्र राधानगरी धरणाचे ४ दरवाजे १० ऑगस्ट उघडल्याने पंचगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीजवळ आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी आज ४१ फूट ८ इंच (धोक्याची पातळी ४३ फूट) नोंदवली गेली. अलमट्टी धरणातून सध्या चालू असणारा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून तो २ लाख घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला आहे.

अन्य घडामोडी

१. कोल्हापूर-गगडबावडा, इचलकरंजी-कुरुंदवाड, चंडगड-दोडामार्ग, मलकापूर-शित्तूर यांसह अन्य काही छोटे मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंदच.

२. महापालिकेच्या शिंगणापूरसह तिन्ही उपसा केंद्राच्या परिसरात पुराचे पाणी आले आहे. सध्या उपसा केंद्र येथे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ५४४ मीटर असून ५४६ मीटरपेक्षा अधिक पाणी आल्यासच उपसा केंद्र बंद ठेवावे लागते. त्यामुळे सध्यातरी शहरात पाण्याचे संकट नाही, अशी माहिती जलअभियंता यांनी दिली.

३. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली आणि आंबेवाडी येथील ५०० कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाली आहेत.

४. कोयना धरण ८४ टी.एम्.सी. भरले असून सांगलीत आयर्विन पूल येथे कृष्णा नदीची पाण्याची पातळी २७ फूट नोंदवण्यात आली.

५. कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथे या वर्षी दुसर्‍यांदा दक्षिणद्वार सोहळा झाला. श्रावणात सोहळा होत असल्याने भाविकांनी गर्दी केली होती.