|
मुंबई – महाराष्ट्र पोलीस दलातील २ लाख १९ सहस्र ७७६ पदे संमत आहेत; परंतु त्यांतील २९ सहस्र ४०१ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात जुलै २०२२ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती समोर आली. ही रिक्त पदे भरण्याविषयीचे धोरण ९ नोव्हेंबरपर्यंत शपथपत्राद्वारे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. नगरमधील कोपरगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने राज्याच्या गृहविभागाला शपथपत्र सादर करण्याचा आदेश दिला.
राज्यात १ लाख लोकसंख्येमागे १९८ पोलीस असणे अपेक्षित आहे. सध्या मात्र १७४ पोलीस आहेत. वेळेत पदोन्नती दिली जात नसल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत आहे. कोरोनापूर्वी पोलीस दलामध्ये ५ टक्के पदे रिक्त होती. कोरोनानंतर रिक्तपदांची संख्या १३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. राज्याच्या गृहविभागाकडून ५ जुलै या दिवशी न्यायालयात सादर केलेल्या शपथविधीतून ही माहिती पुढे आली आहे.
पोलिसांची संख्या वाढवावी, पोलिसांच्या कामाची वेळ ८ घंटे करावी, रिक्त पदे भरण्यात यावीत, पोलिसांची वाहने अद्ययावत करावीत, तसेच पोलीस यंत्रणा सक्षम करावी, अशाही मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत.
संपादकीय भूमिकापदे रिक्त असल्याने अन्य कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो आणि कामेही प्रलंबित रहातात. राज्यातील गुन्ह्यांची संख्या पहाता पोलीस दलातील पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यासाठी सामान्य नागरिकांना न्यायालयात याचिका का करावी लागते ? |