नाशिक येथे खाद्यतेलाच्या आस्थापनावर अन्न सुरक्षा विभागाची धाड, १ कोटी १० लाखांचा साठा जप्त !

नाशिक येथे खाद्यतेलाच्या आस्थापनावर अन्न सुरक्षा विभागाची धाड

नाशिक – उच्च प्रतीचे खाद्यतेल असल्याचे विज्ञापन करून ग्राहकांना अल्प दर्जाचे खाद्यतेल विक्री केले जात असल्याच्या संशयावरून येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नाशिक तालुक्यातील शिंदे येथील नायगाव रस्त्यावरील ‘मे. माधुरी रिफायनर्स प्रा.लि.’ या कारखान्यावर धाड टाकून १ कोटी १० लाख ११ सहस्र २८० रुपये किमतीच्या खाद्यतेलांचा साठा जप्त केला. ११ ऑगस्ट या दिवशी ही कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत अन्न सुरक्षा विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासमवेतच खाद्यतेलाचे नमुने पडताळण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. देहली येथील अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात नामांकित ब्रँडसह अन्य खाद्यतेलांचे नमुने कह्यात घेऊन पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत.

मे. माधुरी रिफायनर्स प्रा.लि. या कारखान्यातील खाद्यतेलांच्या डब्यांवरील लेबलमध्ये दोष आढळून आला. लेबलवर केलेल्या दाव्यात ‘फोर्टीफाइड’ (पौष्टिक असल्याचे प्रमाणीकरण) खाद्यतेलाचा उल्लेख करण्यात आलेला होता; मात्र प्रत्यक्षात त्याचे चिन्ह नव्हते.

अन्न सुरक्षा विभागाने विशेष मोहीम आणि नियमित कारवाई अंतर्गत नाशिक विभागातून ३१ खाद्यतेल आणि १ वनस्पती तेल, असे एकूण ३२ नमुने पडताळणीसाठी कह्यात घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.