इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आणि घरगुती श्री गणेशमूर्ती शहापूर खाणीत विसर्जन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयास शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होण्यासाठी आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांना ८ ऑगस्ट या दिवशी भेटून निवेदन देण्याचा निर्णय व्यंकोबा मैदानात झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
गेली २ वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहापूर खाणीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्या वेळी नागरिक आणि मंडळे यांनी प्रशासनास सहकार्य केले; मात्र मंडळे पंचगंगा नदीतच विसर्जनास आग्रही आहेत. त्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि सभासद यांनी सकाळी १० वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.