परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असलेले सासवड (पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) !

श्री. यशवंत वसाने

श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) मुंबईतील ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये तंत्रज्ञ (‘टेक्निशियन’) म्हणून नोकरी करत होते. वर्ष १९९६ मध्ये ते पू. वटकरकाकांच्या समवेत सांगली येथील गुरुपौर्णिमेला गेले. त्यानंतर त्यांच्या साधनेला आरंभ झाला. वर्ष २०१८ मध्ये ते सासवड (पुणे) येथे स्थायिक झाले. त्यांचा पुतण्या आणि पुणे येथील साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. श्री. प्रसाद वसाने (पुतण्या, वय २४ वर्षे), सासवड

१ अ. ‘घर म्हणजे श्री गुरूंचा आश्रम आहे’, असा भाव असलेल्या वसानेकाकांमध्ये ‘स्वच्छता’ आणि ‘नीटनेटकेपणा’ हे स्थायी गुण असणे : ‘स्वच्छता’ आणि ‘नीटनेटकेपणा’ हा दादांचा (श्री. यशवंत वसाने यांना घरात सर्वजण ‘दादा’ म्हणतात.) स्थायी गुण आहे. दादांचे घर नेहमीच अत्यंत स्वच्छ आणि व्यवस्थित असते. ‘घर म्हणजे श्री गुरूंचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) आश्रम आहे’, असा त्यांचा भाव असल्याने त्यांच्या घरात चांगली स्पंदने जाणवतात.

१ आ. इतरांना साहाय्य करणे आणि आधार देणे : माझे वडील (कै. जनार्दन वसाने) कर्करोगाने आजारी असतांना दादांनी आम्हाला पुष्कळ साहाय्य केले. त्यांनी आमच्या सर्व नातेवाइकांनाही पुष्कळ साहाय्य केले आहे. आम्हा सर्वांनाच त्यांचा आधार वाटतो.

१ इ. परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा : काकांची श्री गुरूंवर दृढ श्रद्धा आहे. वर्ष २०१० मध्ये माझ्या काकूंचे (सौ. हेमलता यशवंत वसाने यांचे) निधन झाल्यावर आणि माझे बाबा रुग्णाईत असतांना काकांची परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा कधी डळमळीत झाली नाही. ‘प्रत्येक अडचणीच्या वेळी गुरुदेव आपल्या समवेत आहेत आणि ते घरातही आहेत’, अशी त्यांची श्रद्धा असते.

१ ई. काकांमध्ये झालेले पालट – अपेक्षा न्यून  होणे : ‘दादांचे कुटुंबियांकडून अपेक्षा करण्याचे प्रमाण न्यून झाले आहे’, असे मला जाणवते. अलीकडे ते कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता इतरांची सेवा म्हणून सर्व कृती करतात.’

२. सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), पुणे

२ अ. गुरुकार्याची तळमळ : ‘परिपूर्ण आणि तळमळीने सेवा करणे’, हा काकांचा स्थायी भाव आहे. सासवड हे गाव पुण्यापासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील सर्व उपक्रमांना उपस्थित रहायला जमत नाही. तरीही ते ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या माध्यमातून समष्टी सेवेची सर्व सूत्रे जाणून घेतात आणि ती सूत्रे सासवड येथे राबवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतात.

२ आ. भाव

२ आ १. काकांनी त्यांच्या घराभोवती असलेल्या बागेची भावपूर्ण निगा राखल्याने तेथून आणलेली झेंडूची फुले ३ दिवसांनंतरही टवटवीत रहाणे : काकांनी त्यांच्या घराभोवती फुलझाडे आणि आयुर्वेदीय वनस्पती यांची लागवड करून त्यांचे चांगले संवर्धन केले आहे. वर्ष २०१९ मध्ये दसर्‍याच्या आदल्या दिवशी आम्ही काकांच्या घरी एका सत्संगासाठी गेलो होतो. तेथून येतांना त्यांच्या बागेतील झेंडूची थोडी फुले मी पूजेसाठी घरी आणली होती. ती फुले ३ दिवसांनंतरही टवटवीत राहिली आणि त्यांचा सुगंधही टिकून राहिला होता. त्या वेळी ‘काकांनी बागेची भावपूर्ण निगा राखल्याने फुले टवटवीत राहिली’, असे मला जाणवले.

३. श्री. नारायण टोपण्णा पाटील (वय ७४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), पुणे

३ अ. उतारवयातही तळमळीने सेवा करणे : ‘दळणवळण बंदीपूर्वी गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा यानिमित्त  सेवा करण्यासाठी काका सासवडहून पुण्याला येत. या वयातही ते ‘धर्मप्रेमींना संपर्क करणे, प्रसार करणे, धर्मप्रेमींना सभेला घेऊन येणे’, आदी सेवा करतात.

३ आ. काकांनी केलेल्या फलकलेखन सेवेतून अनेक जिज्ञासू सनातन संस्थेशी जोडले जाणे : काकांचे अक्षर पुष्कळ सुंदर आहे. ते सासवडमधील पुष्कळ फलकांवर धर्मशिक्षण देणारी माहिती लिहितात. त्यांनी केलेल्या फलकावरील लेखन सेवेमुळे पुष्कळ जिज्ञासू सनातन संस्थेशी जोडले गेले आहेत.’

४. श्री. लक्ष्मण सखाराम जेधे (वय ७५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सासवड, पुणे

४ अ. स्वतःपेक्षा गुरुकार्याला महत्त्व देणे : ‘काकांना वैयक्तिक जीवनात पुष्कळ अडचणी आहेत; परंतु ते त्याविषयी कधी बोलत नाहीत आणि त्यांचा सेवेवर परिणामही होऊ देत नाहीत.’