स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील स्वाभिमानी भारत निर्माण करणे आवश्यक !

१५ ऑगस्ट २०२२ या दिवशी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने लेखमाला…

आपल्या भारत देशात ३ प्रकारचे लोक रहातात. पहिले देश घडवणारे, दुसरे बघ्याची भूमिका घेणारे आणि तिसरे देशाचे तुकडे करू पहाणारे. या सर्वांमध्ये बघ्याची भूमिका घेणारे लोक अधिक आहेत.

१. ‘देशात काहीही घडो’, बघ्याची भूमिका घेणार्‍यांना काहीही फरक न पडणे आणि त्या लोकांनी देशासाठी पुढे येण्याची आवश्यकता असणे

आज संपूर्ण देश ‘फ्री काश्मीर’ (स्वतंत्र काश्मीर), नागरिकत्व सुधारणा कायदा, धर्मांतर, जातीयवाद, दंगली, लव्ह जिहाद, थूक जिहाद, हलाल जिहाद आणि यांसारख्या अनेक सूत्रांमध्ये भरडला जात आहे. त्यात खून, चोरी, बलात्कार यांसारख्या घटनांचीही भर पडत आहे. सध्या आपला देश स्वतःशीच युद्ध करत आहे. देशात राहूनसुद्धा काही समाजकंटक तिरंग्याचा अपमान करत आहेत, देशविरोधी घोषणा देत आहेत. देशाच्या संपत्तीची नासधूस करत आहेत. भर रस्त्यात तिरंगा (राष्ट्रध्वज) जाळला जात आहे. अशा प्रकारची कृत्ये वारंवार घडतात; कारण आज बघ्याची भूमिका घेणारे लोक अधिक आहेत. देशात काहीही घडो, या लोकांना काही फरक पडत नाही. एका कानाने ऐकतात आणि दुसर्‍या कानाने सोडून देतात. डोळे असूनही आंधळ्यासारखे वागतात. हे लोक केवळ स्वतःचाच विचार करतात; मात्र याचा लाभ हे देश तोडणारे देशद्रोही लोक घेतात. आज आपल्या देशाला खरी आवश्यकता आहे, ती बघ्याची भूमिका घेणार्‍या लोकांनी एक पाऊल पुढे येण्याची ! आज प्रत्येक भारतियाच्या मनात कणभर जरी देशभक्ती रुजवली, तरी देशातील अशा प्रकारची देशद्रोही कृत्ये नक्की अल्प होतील.

२. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महापुरुषांचा आदर्श ठेवायला हवा !

श्री. विजय होबळे

आज आपली देशभक्ती केवळ १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताकदिन) या दिवसापर्यंतच मर्यादित राहिली आहे. असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि अगणित अनामिका यांच्या बलीदानाने आपल्याला अगदी विनामूल्य मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण अपलाभ तर घेत नाही ना ? यांचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक अशा अनेक महापुरुषांनी उच्चशिक्षण घेऊनसुद्धा स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग ब्रिटिशांची चाकरी करण्यासाठी केला नाही. त्यांनी शिक्षणाचा उपयोग आपल्या देशाच्या कल्याणासाठी केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज बघ्याची भूमिका घेणार्‍या लोकांप्रमाणे त्याही महापुरुषांनी जर स्वतःचाच विचार केला असता, तर आजही आपण पारतंत्र्यात राहिलो असतो आणि इंग्रजांची गुलामी करत बसलो असतो.

३. देशात घडणार्‍या घटनांमुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता !

खरेतर तिरंग्याच्या विरोधातील घोषणा, देशाचा अपमान करणारी कृत्ये, आपल्या सैनिकांवर होणारे परकियांचे आक्रमण या सर्व घटनांमुळे आज देशातील युवकांनी पेटून उठायला हवे होते. दुर्दैवाने असे काहीच घडत नाही आणि याचा पुरेपूर लाभ देशाचे तुकडे करू पहाणारे देशद्रोही लोक घेत आहेत. असेच प्रकार जर चालू राहिले, तर आपल्या देशाची अधोगती होऊन आपण पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही. यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आपण संघटित होऊन या देशद्रोही लोकांना सळो कि पळो करून सोडले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील स्वाभिमानी भारत निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

४. भारत महासत्ता होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा वेळ देऊन देश घडवायला हवा !

खरेतर देशप्रेम शाळेतूनच मुलांच्या मनात रुजवले पाहिजे. आपली देशभक्ती केवळ सामाजिक माध्यमांवर अभिप्राय देण्यापुरती मर्यादित ठेवून चालणार नाही,  तर ती प्रत्यक्ष उतरवली पाहिजे. उच्चशिक्षित लोकांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्य आणि सामर्थ्यवान भारत घडवणे यांसाठी केला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अनेक महापुरुषांनी देशासाठी केलेल्या त्यागाचा इतिहास आणि त्यांनी जातीयवादाच्या विरोधात केलेल्या कार्याची माहिती शाळांतून पोचवली पाहिजे. आपले देशप्रेम पावलापावलांवर प्रकट व्हायला हवे. आपली संस्कृती टिकून रहावी, यासाठी आपण जेव्हा एकमेकांना भेटतो, भ्रमणभाषवर संपर्क करतो, त्या वेळी ‘हाय-हॅलो’ न म्हणता ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’, ‘नमस्कार’, ‘जय श्रीराम’, अशा शब्दांनी बोलणे प्रारंभ केले पाहिजे. आपण प्रत्येकाने असा निश्चय केला पाहिजे की, कुणी तिरंग्याचा (राष्ट्रध्वजाचा) किंवा माझ्या भारतमातेचा अपमान केला, तर त्या अपमानाचे उत्तर त्याच पद्धतीने म्हणजेच वैध मार्गाने दिले जाईल. ‘माझा थोडातरी वेळ मी माझा देश घडवण्यासाठी देईन’, असा निर्धार केला, तर आपला भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.

– श्री. विजय होबळे, वीर सावरकर युवा मंच, डिचोली, गोवा. (२९.७.२०२२)