‘सर्वसाधारण साधक नामजप, ध्यान, सत्संग, सत्सेवा इत्यादी माध्यमांतून साधना करतात. यात साधकांच्या संपूर्ण देहाचा सहभाग असतोच, असे नाही. नामजप, ध्यान, सत्सेवा आदी करतांना होणार्या शारीरिक हालचाली सीमित असल्याने त्याच्यातील सत्त्वगुण वाढीस लागतो. त्यामुळे साधक ‘सत्त्वगुण प्रधान’ असतो.
नृत्यात संपूर्ण शरिराच्या सहभागाने नृत्याराधना होत असल्यामुळे तुलनेत नृत्याच्या माध्यमातून साधना करणार्या साधकाला संपूर्ण देहाचा उपयोग करावा लागतो. नृत्यामधे शरिराच्या हालचाली अधिक असल्याने त्यात काही प्रमाणात रजोगुण असतोच. साधक केवळ नृत्यच नव्हे, तर नृत्यासह नामजप, ध्यान, सत्सेवा इत्यादींचीही जोड नृत्य आराधनेला देतो. त्यामुळे सामान्यतः नृत्य हे रजप्रधान असले, तरी नृत्यकलेच्या माध्यमातून साधना करतांना त्यात सात्त्विकताही येते. त्यामुळे नर्तक साधकामध्ये त्रिगुणांपैकी सत्त्वगुण हा प्रधान न रहाता तो साधक ‘रज-सत्त्व प्रधान’ असतो. या नर्तक साधकाची आध्यात्मिक पातळी वाढत गेल्यावर तो जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होऊन त्याला पुढे संतपद प्राप्त झाल्यामुळे त्याचे आध्यात्मिक सामर्थ्य वाढते. त्यामुळे नृत्यातील हालचालींमुळे निर्माण होणार्या रजोगुणाचा त्याच्यावर फारसा परिणाम न होता साधक नर्तक ‘सत्त्वगुण’ प्रधान रहातो.
(‘सर्वसाधारण साधक नामजप, ध्यान, सत्सेवा इत्यादी माध्यमांतून देवाशी अनुसंधानात असतात. नर्तक साधकांचा सराव किंवा नृत्य सादर करतांना ईश्वर हा केंद्रबिंदू असतो. सतत देवाला अनुभवणे आणि त्याचे चिंतन करणे यांमुळे त्यांचा ‘सत्त्वगुण’ वाढण्यास साहाय्य होते.’ – संकलक)
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.२.२०२२)