संचालकांकडे स्पष्टीकरण मागणार ! – रवि नाईक, नागरी पुरवठा मंत्री

तूरडाळीची नासाडी झाल्याचे प्रकरण

पणजी, ५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील जनतेला कोरोना महामारीच्या काळात वाटपासाठी आणलेल्या तूरडाळीच्या साठ्यातील तब्बल २४१ टन डाळ सडली आहे. आता त्या डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खाते यांनी दुसर्‍यांदा निविदा काढली आहे. यामुळे सरकारची नाचक्की झाली आहे. याविषयी नागरी पुरवठा मंत्री रवि नाईक म्हणाले, ‘‘ही डाळ माझ्या कारकिर्दीत आणलेली नाही, तरीही मी याविषयी खात्याच्या संचालकांकडे स्पष्टीकरण मागणार आहे. या सडलेल्या तूरडाळीची विल्हेवाट लावण्यासाठी खात्याने निविदा मागवल्या आहेत. ही निविदा १६ ऑगस्ट या दिवशी उघडण्यात येणार आहे.’’

कोरोना महामारीच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद असल्याने कडधान्यांसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचा दर काळाबाजारी, साठेबाजी, ग्राहकांची असाहाय्यता आदींमुळे गगनाला भिडले होते. यावर उपाय म्हणून नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने तांदुळ, साखर, गहू, तेल आदींसह तूरडाळही नागरिकांना उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. खात्याने ४०० मेट्रीक टन तूरडाळ ८३ रुपये प्रतिकिलो दराने विकत घेऊन ती राज्यातील स्वस्त धान्य दुकानांना वितरित केली. या वेळी खुल्या बाजारात डाळीची किंमत ११० ते १२० रुपये प्रतिकिलो होती; मात्र स्वस्त धान्य दुकानातील डाळीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद लाभला. स्वस्त धान्य दुकानदारांनी शिल्लक राहिलेली उर्वरित डाळ काही मास स्वत:कडे ठेवून ती नंतर खात्याला परत केली. अशा प्रकारे शिल्लक राहिलेली सुमारे २४१ मेट्रीक टन डाळ गेल्या २ वर्षांपासून खात्याच्या गोदामात पडून आहे. यासाठी प्रचंड जागा व्यापल्यामुळे खात्याला अन्य कडधान्य ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. यावर उपाय म्हणून खात्याने वर्ष २०२१ मध्ये निविदा मागवणारे विज्ञापन काढले; परंतु खरेदीदार मिळाले नाहीत. आता वर्षभरानंतर खात्याने पुन्हा एकदा विक्रीसाठी निविदा काढली आहे.

दक्षता खात्याच्या वतीने अन्वेषण होणार ! – संजीत रॉड्रिग्स, सचिव, नागरी पुरवठा खाते

२४१ टन तूरडाळाची नासाडी झाल्याच्या प्रकरणी नागरी पुरवठा खात्याने या प्रकरणाचे अन्वेषण करण्याची मागणी करणारी धारिका दक्षता खात्याकहे सुपुर्द केली आहे. या प्रक्रियेमुळे काही त्रुटी असल्याचे लक्षात आले आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीत रॉड्रिग्स यांनी दिली आहे.

अन्वेषण करून अधिकार्‍यांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नागरी पुरवठा खात्याने साठवलेल्या तुरडाळीची नासाडी कशी झाली ? याचे अन्वेषण करून संबंधित अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.