संभाजीनगर – शहरात भीषण पाणीप्रश्न असतांना महानगरपालिकेने मागील १० वर्षांत अर्थसंकल्पात पाण्यासाठी अत्यल्प तरतूद केली होती. चालू वर्षीही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यांसह इतर गोष्टींवर होणारा व्यय अल्प करून तो शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी करण्यात यावा, तसेच महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणीप्रश्न सोडवण्यासाठी भरघोस तरतूद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी ‘रायभान जाधव विकास आघाडी’चे अध्यक्ष आणि कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ५ ऑगस्टपासून महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ‘आमरण उपोषण’ चालू केले आहे. ‘महापालिका मागण्या पूर्ण करण्याविषयी लेखी आश्वासन देईपर्यंत हे उपोषण चालू राहील’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
हर्षवर्धन जाधव म्हणाले की, महानगरपालिकेत गेल्या १० वर्षांत ६ सहस्र २८० कोटी रुपये जमा झाले होते. त्यांपैकी केवळ ६५२ कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर व्यय करण्यात आले, तसेच वर्ष २०२२-२३ साठी सिद्ध करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातही १ सहस्र ७२८ कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यांपैकी केवळ ११२ कोटी हे पाणीपुरवठ्यावर व्यय करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील भीषण पाणीटंचाई दूर होणे अशक्य आहे. महानगरपालिका प्रशासनाने अर्थसंकल्पामध्ये अधिकची तरतूद ही पाणीपुरवठ्यासाठी करावी. शहरातील सिमेंटचे रस्ते आणि इतर कामे यांमध्ये अल्प व्यय करून तो पैसा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वापरावा.