नाशिक – ‘अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग’ आणि ‘गुरुपीठ त्र्यंबकेश्वर’ अंतर्गत ‘सक्रिय आरोग्यदूत’ अभियानाच्या वतीने गंगा गोदावरी स्वच्छता, गरजूंना वस्त्रदान, आरोग्य पडताळणी अन् विनामूल्य औषधोपचार अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ४ ऑगस्ट या दिवशी गोदावरी स्वच्छतेने या मोहिमेला प्रारंभ झाला. गोदावरी पूजन केल्यानंतर पहिल्याच दिवशी १ सहस्र सेवेकर्यांनी रामकुंड ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंतच्या परिसराची स्वच्छता केली.
सेवेकर्यांना मार्गदर्शन करतांना ‘श्री स्वामी समर्थ गुरुपिठा’चे महाव्यवस्थापक चंद्रकांत मोरे म्हणाले की, केवळ १ दिवस स्वच्छता करून आपल्याला थांबायचे नाही. जगभरातील ८ सहस्रांहून अधिक केंद्रांच्या माध्यमातून आपल्याला वर्षभर सातत्याने हे अभियान राबवायचे आहे. त्र्यंबकेश्वर ते आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री म्हणजे गोदावरी जेथे समुद्राला मिळते, तेथपर्यंत त्या त्या भागांतील सेवेकरी मासातून एकदा हे अभियान राबवून स्वच्छता करतील.