१. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरोहितांसमवेत धार्मिक विधी केल्याने पुरोगाम्यांचा तीळपापड होणे आणि त्यांच्याकडून त्या विरोधात प्रश्नांची सरबत्ती केली जाणे
‘भारताच्या राष्ट्रपती म्हणून माननीय द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी नुकताच पार पडला. त्या वेळी सामाजिक माध्यमांमध्ये एक चित्रफीत प्रसारित झाली होती. त्यात राष्ट्रपती या काही पंडित, ब्राह्मण किंवा पुरोहित यांच्यासमवेत उभ्या असल्याचे दिसते. तेथील मंत्रोच्चारांवरून त्या ठिकाणी काही धार्मिक विधी चालू असल्याचे दिसते. ही चित्रफीत समोर आल्यानंतर पुरोगामी आणि राज्यघटनेचे कथित रक्षणकर्ते (सर्वकाळ राज्यघटना डोक्यावर घेऊन फिरणारे लोक) हे पंतप्रधान आणि प्रशासन यांना प्रश्न विचारू लागले, ‘‘स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आहेत; परंतु इतक्या वर्षांत कुठल्याही राष्ट्रपतींनी कधी धार्मिक विधी करून शपथ घेतली नव्हती. केवळ द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्याने त्यांच्यासाठी हे शुद्धीकरण केले का ? हा त्यांच्या समवेत भेदभाव असून त्यांचा अपमान आहे.’’ ‘आदिवासी आर्मी’चे कार्यकर्ते म्हणाले, ‘‘पुजारी मंत्र म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डोक्यावर अक्षता टाकत होते. हा एका महिलेचा अपमान आहे.’’ आणखी एक प्रश्न विचारला गेला, ‘‘हे राष्ट्र्रपती भवन किंवा राष्ट्रपतींचे यांचे भगवेकरण आहे का ? राष्ट्रपती मुर्मू यांनी हात जोडलेले नव्हते, तसेच हे मंत्रोच्चार त्यांच्या इच्छेविरुद्ध चालले असल्याचे त्यांच्या चेहर्यावरून दिसत होते.’’ राष्ट्रपती केवळ विधीच्या ठिकाणी उपस्थित राहिल्याने त्यांची आदिवासी प्रतिष्ठा निघून जाते का ? त्या आदिवासी आहेत आणि पुढेही रहातील.
एका चित्रफीतीमध्ये (धार्मिक कार्यक्रमात) पूर्वाश्रमीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही काही पुरोहितांच्या समवेत दिसतात. दोन्ही चित्रफीती मुद्दामहून एकत्रित किंवा एका पाठोपाठ प्रसारित केल्या का ? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २ वर्षांपूर्वी एक धार्मिक कार्यक्रम केला होता. त्याची ही चित्रफीत होती; मात्र सामाजिक माध्यमांवर असेही सूचित करण्यात येत होते की, २ उच्चपदस्थ व्यक्ती प्रतिष्ठेचे पद सोडतांना आणि ग्रहण करतांना देव, ब्राह्मण, पुरोहित अन् समाजातील व्यक्ती यांना साक्षी ठेवून पद हस्तांतरित करत होत्या. तर यात पुरोगाम्यांना दुःख होण्याचे काही कारणच नाही !
२. भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी ‘फोडा आणि झोडा’ नीती अवलंबून हिंदूंमध्ये फूट पाडणे अन् उपेक्षित वर्ग म्हणून काही जातीच्या लोकांना आरक्षण दिले जाणे
आता पुरोगाम्यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न पाहूया. ते म्हणाले की, आदिवासी हे हिंदु नाहीत. त्यामुळे राष्ट्रपतींचा चेहरा चिंतित होता. त्यांनी पुरोहितांच्या धार्मिक कार्यक्रमात हातही जोडले नव्हते. ‘हिंदु विवाह कायदा’ हा आदिवासींना लागू नाही. यासाठी अनुसूचित जाती-जमाती किंवा प्रत्येक राज्याने स्वतःच्या राज्यात घोषित केलेल्या काही भटक्या आणि विमुक्त जमाती यांचा विचार करू. भारतावर राज्य करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी ‘फोडा आणि झोडा’, या नीतीनुसार सर्वप्रथम मुसलमान अन् हिंदु यांच्यात सतत भांडणे चालू रहावीत, या पद्धतीने शासन सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्यास प्रारंभ केला. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात अनुसूचित जाती-जमाती, भटक्या आणि विमुक्त जमाती, तसेच इतर मागासवर्गीय असा मोठा वर्ग हा विविध वर्गांमध्ये विभागून घेण्यात आला. त्यांना वेगळे आरक्षण दिले गेले. ‘हे वर्ग उपेक्षित असून त्यांच्या विकासासाठी त्यांना काही प्रमाणात आरक्षण आवश्यक होते’, असा हेतू त्या वेळी दाखवला गेला; परंतु इंग्रजांचे त्यांच्यावरील प्रेम हे खोटे होते आणि हिंदु समाज एकसंघ राहू नये, हीच यामागील चाल होती. त्यामुळे तो हेतू त्यांनी साध्य केला.
३. आदिवासी समाज शिव आणि शक्ती यांचा उपासक असून तो हिंदु धर्माचाच एक घटक असणे अन् त्यांच्या रुढी-परंपरा हिंदूंप्रमाणेच असल्याचे लक्षात येणे
भारत स्वतंत्र झाल्यानंतर ‘हिंदूंमध्ये फूट पडावी’, असा इंग्रजांचा डाव होता, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखून होते. त्यामुळे २६ जानेवारी १९५० या दिवशी राज्यघटना लागू झाल्यानंतर त्यांनी ‘केवळ १० वर्षे आरक्षण असावे’, असे घोषित केले होते. सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी ते त्यानंतरही पुढे चालूच ठेवले. आता इंग्रजांनी निर्माण केलेल्या अनुसूचित जमातींत एकूण ४७ जमाती या ‘आदिवासी’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यांची काही वैशिष्ट्ये पाहिली, तर हा समाज शिव आणि शक्ती यांचा उपासक आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरिती, देवीदेवता, त्यांची उपासना करण्याची पद्धत, जन्म-मृत्यूनंतरचे संस्कार, नामकरण संस्कार या सर्व गोष्टी हिंदूंप्रमाणे आहेत. होळी आणि दिवाळी हे सर्व सण साजरे करण्याची त्यांची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. केवळ त्यांना हिंदु विवाहपद्धती कायदा लागू नाही, या कारणाने ते हिंदु धर्माचे शत्रू होऊ शकत नाहीत.
स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५०, १९५६ आणि १९७६ मध्ये ज्या अनुसूचित जमाती घोषित करण्यात आल्या, त्या सर्व आदिवासी म्हणून लाभ उचलण्यासाठी केलेल्या आहेत. आरक्षण मिळण्यासाठी सरकारने नेमलेल्या वैधता पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र देतांना सर्वप्रथम आदिवासी पाळत असलेल्या रुढी, परंपरा, मृत्यूनंतरचा दुखवटा, जन्म आणि लग्न यांच्या वेळीच्या रुढींचा विचार केला जातो. हे सर्व विधी हिंदूंप्रमाणेच आहेत. तरीही त्यांचे सामाजिक स्थान म्हणून स्वतंत्र ओळख रहाते.
४. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला जाण्यास विरोध करणे; पण राष्ट्रपतींनी स्वतःचे कर्तव्य जोपासण्यासाठी पदाचा त्याग करण्याची सिद्धता असल्याचे बाणेदार उत्तर त्यांना देणे
ज्याप्रमाणे लिंगायत हे हिंदूच असून तो काही वेगळा धर्म नाही, त्याचप्रमाणे आदिवासीही हिंदुविरोधी नाहीत. ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षांत असा विधी का झाला नाही ?’, हा प्रश्न पुरोगाम्यांनी विचारला. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, तर प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद होते. एकदा डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सोमनाथ शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला जायचे होते; पण नेहरूंनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. ‘हिंदुस्थान हा देश सर्व धर्मियांचा आहे. अशा वेळी हिंदूंच्या कार्यक्रमाला जाणे, हे योग्य होणार नाही. आपण ‘धर्मनिरपेक्ष’ अशा भारताचे राष्ट्रपती आहात. त्यामुळे आपण या कार्यक्रमाला जाऊ नये’, असे त्यांनी सुचवले. त्या वेळी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी बाणेदारपणे उत्तर दिले, ‘‘माझ्यासाठी सोरटी सोमनाथला जाणे, हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि राहिला प्रश्न राष्ट्र्रपतीपदाचा, तर मी या पदाचे त्यागपत्र द्यायला सिद्ध आहे.’’
५. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी शिवमंदिरात जाऊन भावपूर्ण पूजा करण्यातून त्यांच्यातील संस्कार दिसून येणे आणि त्यातूनच पुरो(अधो)गाम्यांचा तीळपापड होणे
‘राष्ट्रपती’ या पदासाठी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी घोषित झाली, त्या वेळी त्या सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका शिवमंदिरात गेल्या होत्या. त्यांनी मंदिराची स्वच्छता केली. तेथे अतिशय भावपूर्ण आणि शास्त्रोक्त पद्धतीने, म्हणजे नंदीच्या २ शिंगांमधून अन् नंदीच्या मागे उभ्या रहात शिवाचे दर्शन घेऊन त्याला नमस्कार केला. ‘जणूकाही देशासाठी मोठे दायित्व पार पाडण्याच्या दृष्टीने देवाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांनी ही कृती केली’, असे म्हणण्यास काय हरकत आहे ? ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. जेव्हा राष्ट्रपती, पंतप्रधान अथवा उच्चपदस्थ सरकारी पद भूषवणारी व्यक्ती एखादा दर्गा, मशिदी किंवा मजार येथे दर्शनाला जातात, तेव्हा माध्यमांकडून सर्वधर्मसमभावाचा उदो उदो केला जातो. नवीन राष्ट्रपती या आदिवासी समाजाच्या असून धार्मिक वृत्तीच्याही आहेत. त्यांनी स्वतःच्या विजयाचे सर्व श्रेय हे भारतीय राज्यघटनेला दिले आहे. यावरून लक्षात येते की, त्या एक परिपूर्ण संस्कारित व्यक्ती आहेत. ब्राह्मण पंडित मंत्रोच्चार करत राष्ट्रपतींना वेदोक्त पद्धतीने शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या कार्यासाठी देवाला प्रार्थना करत आहेत, हे पाहिल्यानंतर पुरो(अधो)गाम्यांचा तीळपापड होणे, हे समजू शकते. त्यांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याची संधी मिळाली आणि त्याचा त्यांनी लाभ घेतला.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (३१.७.२०२२)
जेव्हा राजकारणी दर्गा किंवा चर्च येथे जातात, तेव्हा कथित पुरो(अधो)गाम्यांची धर्मनिरपेक्षता कुठे असते ? |