अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट पहाण्यास प्रेक्षकांचा स्पष्ट नकार !

मुंबई – ‘पीके’सारख्या चित्रपटांतून हिंदु देवतांची खिल्ली उडवणारे अभिनेते आमीर खान यांच्यावर हिंदू प्रचंड अप्रसन्न आहेत. नुकतेच अभिनेते रणबीर सिंग यांच्या ‘समशेरा’ या चित्रपटातही सिंग यांना जाणीवपूर्वक हिंदु पेहराव घातलेले दाखवून ‘दुर्जन’ असे दाखवण्यात आले होते; पण हा चित्रपट चालला नाही. त्यामुळे आता ‘लाल सिंह चड्ढा चित्रपटाचीही तीच अवस्था होणार आहे. आमीर खान यांचे नावही काढू नका’, अशी प्रतिक्रिया चित्रपटगृहात अन्य चित्रपट पहाण्यासाठी येणार्‍या प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.

काही ‘यू ट्युब वाहिन्या’, ‘बेव पोर्टल’ यांनी प्रेक्षकांची मते जाणून घेतली असता, त्यांनी यापुढे आमीर खान यांचा कोणताही चित्रपट पहाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे ‘हिंदू जागृत होत असून देवतांची विटंबना करणार्‍या आणि भारताविषयी अनुद्गार काढणार्‍या अभिनेत्याला जागा दाखवून देण्यास सिद्ध आहेत’, हेच यावरून स्पष्ट होत आहे.