अमरावती – परतवाड्यातील इयत्ता अकरावीत शिकणार्या विद्यार्थ्याने वडिलांच्या शिकवणीवर्गाच्या कार्यालयातील संगणक आणि प्रिंटर यांचा वापर करून ५०० रुपयांच्या बनावट नोटा सिद्ध केल्या आणि त्या चलनातही आणल्या. पोलिसांनी तीन नकली नोटांसह संगणक, प्रिंटर आणि अन्य साहित्य इत्यादी ३३ सहस्र १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुलाला कह्यात घेण्यात आले आहे.
त्या मुलाने किराणा मालाच्या दुकानात ५०० रुपयांची नोट देत ४५ रुपयांचे चॉकलेट खरेदी केले. दुकानदाराला त्या नोटेविषयी संशय आल्याने त्याने त्याविषयी मुलाला विचारले. त्याने ही नोट ए.टी.एम्.मधून काढल्याचे सांगितले. दुकानदाराने त्याच्याकडे आधारकार्ड मागितले. ते खिशातून काढतांना त्याच्याकडे आणखी दोन ५०० रुपयांच्या नोटा आढळून आल्या. आपला प्रकार उघड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुलाने तेथून पळ काढला.
दुकानदाराने ५०० रुपयांच्या तीनही नोटा पोलिसांकडे दिल्या. पोलिसांनी त्या मुलाचा शोध घेतल्यावर त्याच्या वडिलांच्या शिकवणीवर्गाच्या कार्यालयात बनावट नोटा छापण्याचे साहित्य आढळून आले. बनावट नोटेवर खर्या नोटांप्रमाणे अक्षर आणि चित्र ‘स्कॅन’ होत असे; मात्र खर्या नोटेवर असलेले महात्मा गांधींचे चित्र बनावट नोटेवर नव्हते; कारण नोटेवरील गांधींचे चित्र ‘स्कॅन’ होत नाही. हे त्या मुलाच्या लक्षात आले नाही; पण दुकानदाराला नोटेवर चित्र न दिसल्यामुळे वरील प्रकार उघड झाला.