देवाला शरीर, मन आणि बुद्धी अर्पण करण्याविषयी साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

१. ‘देवाच्या चरणी शरीर अर्पण होत आहे’, या विचाराने आश्रमातील शारीरिक सेवा करतांना आनंद मिळणे

कु. रूपाली कुलकर्णी

‘परात्पर गुरुदेव, पूर्वी मला वाटायचे, ‘माझ्यात पुष्कळ स्वभावदोष असल्यामुळे मला काही जमत नाही आणि पुढेही जमणार नाही. किमान सनातनच्या आश्रमातील शारीरिक सेवा केल्यामुळे देवाच्या चरणी माझे शरीर अर्पण होईल.’ माझा असा विचार असल्यामुळे मला आश्रमातील शारीरिक सेवा करतांना आनंद मिळायचा.

२. वर्ष २०१४ मध्ये मी रुग्णाईत झाल्यापासून मला शारीरिक सेवा करण्यास मर्यादा आल्या. तेव्हापासून ‘मी देवासाठी काहीच करू शकत नाही’, याचे मला वाईट वाटायचे.

३. प.पू. भक्तराज महाराज रचित ‘देवा तुझेच मी लेकरू ।’ या भजनातील ओळी ऐकणे

एकदा मी प.पू. भक्तराज महाराज रचित ‘देवा तुझेच मी लेकरू ।’ या भजनातील पुढील ओळी ऐकल्या.

तन मी तुजला जरी अर्पियले ।
कोण दयेने प्राप्त हे झाले ।
अजूनही मजला का न उमजले ।
कसे तुजला अर्पण करू ।
तुझी कशी सेवा करू ।।

४. ‘देवाच्या दयेने तन, मन आणि बुद्धी प्राप्त झाल्याने ते देवाच्या चरणी अर्पण कसे करायचे ?’, याविषयी देवच सांगणार आहे’, असे वाटून ‘साधना कशी होणार ?’, याचा मनावरील ताण न्यून होणे

तेव्हा मला वाटले, ‘मी’ शारिरीक सेवा करते’, हा माझा अहंभाव आहे. हे शरीर देवाच्या दयेने प्राप्त झाले आहे; पण मला ते उमजत नाही. ‘मी देवाची सेवा कशी करू ?’, हेही देव (गुरुदेव) शिकवेल; कारण ज्याप्रमाणे देवाने मला शरीर दिले आहे, त्याप्रमाणे देवाने मला मन आणि बुद्धी दिली आहे. ‘ती कशी अर्पण करायची ?’, ते गुरुदेवच शिकवतील.’ त्यानंतर माझ्या मनावरील ‘माझी साधना कशी होणार ?’, याचा ताण बराचसा न्यून झाला.

‘परात्पर गुरुदेव, मी अजाण आहे. ‘सेवा कशी करायची ?’, हे मला ठाऊक नाही. ‘आपण मला आपल्या चरणांशी आश्रय देऊन माझ्यावर अपार कृपा केली आहे. मला आपल्या कृपेची जाणीव सदैव रहावी’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. रुपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.३.२०२२)