आज श्रावण शुक्ल प्रतिपदा (२९.७.२०२२) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ५५ व्या वाढदिवसानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या सत्संगात त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना शिकण्याची संधी मिळत आहे. प्रत्येक क्षणी सद्गुरु काका आम्हाला भरभरून देत आहेत. आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या ईश्वरी कार्यासाठी लवकर सिद्ध होण्यासाठी सद्गुरु काका आम्हाला अखंड साहाय्य करत आहेत. त्यांतील काही प्रसंग श्रीकृष्णचरणी अर्पण करण्याचा हा प्रयत्न !
१. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची सेवा परिपूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून करवून घेतलेले प्रयत्न
१ अ. भगवान श्रीकृष्णाला केवळ कार्य अपेक्षित नसून कार्यकर्त्यांची साधना होणे, म्हणजेच गुणवृद्धी आणि स्वभावदोष निर्मूलन होणे अपेक्षित असल्याचे सद्गुरु काकांनी सांगणे : दळणवळण बंदीच्या काळात एकदा ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे नियोजन करण्याची सेवा होती. तेव्हा ही सेवा आरंभ करायला आमच्याकडून विलंब झाला. सद्गुरु पिंगळेकाकांनी आम्हाला या चुकीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यांनी आम्हाला ‘भगवान श्रीकृष्णाला केवळ कार्य, सत्संग आणि सोहळा होणे’, हे अपेक्षित नाही, तर त्यातून आमची साधना, म्हणजेच आमच्यात गुणवृद्धी आणि आमचे स्वभावदोष निर्मूलन होणे अपेक्षित आहे’, याची जाणीव करवून दिली.
१ आ. सद्गुरु काकांनी आम्हाला केवळ जाणीव करून न देता आमच्याकडून या सेवेचे बारकाईने चिंतन आणि नियोजन करवून घेतले.
१ इ. ‘आम्ही या सेवेत स्वयंपूर्ण व्हावे’, यासाठी त्यांनी आम्हाला चिंतन करायला प्रोत्साहन दिले आणि प्रत्येक घंट्याला सेवेचा आढावा द्यायला सांगितला.
१ ई. सेवा करतांना संबंधित कार्यकर्त्यांशी बोलून शंकानिरसन करून घेण्यास सांगितल्याने खर्या अर्थाने अभ्यास आणि चिंतन चालू होणे : त्यांनी आम्हाला सेवा आरंभ करतांना अध्ययन करून सूत्रे काढायला सांगितली. आम्हाला काही समजले नसेल किंवा शंका असतील, तर त्यांनी आम्हाला संबंधित कार्यकर्त्यांशी बोलायला सांगितले. त्यामुळे आमचा खर्या अर्थाने अभ्यास आणि चिंतन चालू झाले.
१ उ. त्यांनी आम्हाला नियोजन करतांना विविध समित्यांनुसार चिंतन आणि ‘रिव्हर्स प्लॅनिंग’ (कार्यक्रमाच्या शेवटापासून आरंभापर्यंतचे टप्पे निश्चित करणे) करायला सांगितले.
१ ऊ. त्यांनी आम्हाला नियोजन करतांना ‘आढावा कोण आणि केव्हा देणार ? पाठपुरावा कोण करणार ?’, आदी बारकावे लक्षात आणून दिले.
१ ए. सद्गुरु पिंगळेकाकांनी सेवेचे नियोजन करवून घेतल्याने मनातील नकारात्मक विचार न्यून होण्यास साहाय्य होऊन आत्मविश्वास वाढणे : सद्गुरु काकांनी हे नियोजन करवून घेतल्याने आम्हाला सेवेसंदर्भात सुस्पष्टता आली आणि आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. पूर्वी माझ्या मनात ‘मला नियोजन जमणार नाही’, असे नकारात्मक विचार अधिक असत. वरील प्रकारे प्रयत्न करतांना ते न्यून होण्यास साहाय्य झाले. या नियोजनाचा लाभ अनेक सत्संग-सोहळे आणि तत्सम कार्यक्रम यांचे नियोजन करतांना होत आहे. काही वेळा नियोजन करण्यासाठी अल्प कालावधी असला किंवा संबंधित कार्यकर्ते अनुपस्थित असले, तरीही यानुसार आम्ही नियोजन आणि सेवा करू शकतो.
१ ऐ. समितीच्या कार्यकर्त्यांना हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने पात्र बनण्यासाठी प्रत्येक सेवा शिकण्यास सांगणे : सद्गुरु काका आम्हाला अनेक वेळा सांगतात, ‘‘आपल्याला हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने पात्र बनायचे आहे. प्रत्येक सेवा शिकायची आहे.’’ सद्गुरु काकांच्या बोलण्याचे आध्यात्मिक मोल समजण्यास आम्ही न्यून पडलो; पण सद्गुरु काकांनी आम्हाला शिकवले आणि घडवले.
२. एका ‘पुस्तक मेळाव्या’त ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्याचे नियोजन करण्याच्या सेवेतून सहजरित्या करवलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया !
२ अ. पूर्वी केलेल्या ग्रंथप्रदर्शन कक्षाच्या नियोजनाच्या आराखड्यात थोडा पालट करून सद्गुरु पिंगळेकाकांना दाखवल्यावर त्यांनी ‘पाट्याटाकूपणे सेवा करणे आणि सेवेची तळमळ नसणे’, या स्वभावदोषांची जाणीव करवून देणे : एकदा एका ‘पुस्तक मेळाव्याचे’ नियोजन शिकण्याची मला संधी मिळाली होती. त्या वेळी ‘पूर्वी झालेल्या पुस्तक मेळाव्यात लावलेल्या ग्रंथप्रदर्शन कक्षाचे नियोजन बघून आणि कार्यकर्त्यांच्या साहाय्याने नियोजन सहज होऊ शकते’, असे मला वाटले आणि तसे काही प्रमाणात झाले. पुस्तक मेळाव्यात हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील ग्रंथांचे २ वेगळे कक्ष लावले जातात. ‘वर्षातून एकदाच मिळणार्या या संधीचा गुरुकार्यासाठी आणि आमच्या साधनेसाठी अधिकाधिक लाभ व्हावा’, अशी सद्गुरु काकांची तळमळ होती. सद्गुरु काकांनी ग्रंथप्रदर्शन कक्षाचे सादरीकरण अधिक चांगले आणि परिणामकारक होण्यासाठी मला दोन्ही कक्षांचे (स्टॉलचे) आराखडे (लेआऊट) बनवायला सांगितले. आरंभी मी मागील वर्षाच्या आराखड्यात थोडा पालट करून सद्गुरु काकांना आराखडा दाखवला. तेव्हा त्यांनी माझ्यातील ‘पाट्याटाकूपणे सेवा करणे आणि सेवेची तळमळ नसणे’ या स्वभावदोषांची मला जाणीव करवून दिली.
२ आ. सद्गुरु पिंगळेकाकांनी ४ – ५ विविध आराखडे सिद्ध करवून घेणे आणि ‘प्रत्येक आराखड्यानुसार लावण्यात येणार्या ग्रंथप्रदर्शन कक्षांमुळे होऊ शकणारे लाभ आणि हानी’, असे कोष्टक बनवायला सांगणे : त्यांनी मला नवीन पद्धतीने आराखडे बनवायला सांगितले. आरंभी मला काही सुचत नव्हते. मी तळमळीने प्रार्थना केल्यावर आणि सहकार्यकर्त्यांचे साहाय्य घेतल्यावर भगवंतानेही मला साहाय्य केले. आरंभी मला वाटले होते, ‘ही सेवा २ – ३ घंट्यांत पूर्ण होईल.’ प्रत्यक्षात दीड दिवस लागला. सद्गुरु काकांनी माझ्याकडून दीड दिवसांत ४ – ५ विविध आराखडे बनवून घेतले. त्यांनी मला ‘प्रत्येक आराखड्यानुसार लावण्यात येणार्या ग्रंथप्रदर्शन कक्षांमुळे होऊ शकणारे लाभ आणि हानी’, असे एक कोष्टक बनवायला सांगितले. ते म्हणाले, ‘‘आता पुढील वर्षी कार्यकर्त्यांना वेगळे चिंतन करण्यासाठी अधिक वेळ द्यायला नको. कुणालाही हे कोष्टक बघितले की, समजायला सोपे होईल.’’
‘गुरु शिष्यांना कसे घडवतात ?, त्यांना मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे कसे घेऊन जातात ?’, याविषयी मी विविध उदाहरणे आणि कथा यांतून ऐकले होते. त्याची प्रचीती सद्गुरु काका आम्हाला घडवत असतांना अनेक प्रसंगांत येते. ‘ते शिकण्याची पात्रता या जिवात लवकर निर्माण होऊ दे’, अशी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो.
३. योग्य कृती करण्यास शिकवणे
३ अ. ‘कार्यकर्त्यांना त्यांच्या चुका सांगतांना मनात अपेक्षा किंवा प्रतिक्रिया नसाव्यात’, याची जाणीव करून देणे : एकदा सत्संग झाल्यानंतर मी सद्गुरु काकांना काही सूत्रे सांगायला गेलो. तेव्हा त्यांनी विचारले, ‘‘आज सत्संगात काय झाले ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘एका कार्यकर्त्याकडून साधना करतांना एकाच प्रकारच्या चुका पुनःपुन्हा होत होत्या. आज त्या कार्यकर्त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हावी; म्हणून मी थोडे कठोरपणे सांगितले.’’ तेव्हा सद्गुरु काकांनी मला सांगितले, ‘‘कार्यकर्त्याला चुकांची जाणीव करून द्यायला हवी; पण त्यामागे तुमच्या मनात काही अपेक्षा किंवा प्रतिक्रिया होत्या का ?’, ते पहा. आज सत्संग चालू असतांना मला निराळी स्पंदने येत होती.’’ त्या वेळी मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मी मनात आलेले अपेक्षेचे विचार सद्गुरु काकांना सांगितले. प्रत्यक्षात सत्संग चालू असतांना सद्गुरु काका त्यांच्या कक्षात अन्य सेवा करत होते. सद्गुरु काकांनी सांगितले, ‘‘कृती योग्य प्रकारे केली, तरी त्या मागच्या उद्देशावर आपली साधना अवलंबून असते. आता परत कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांना ‘तुमच्याकडून काय चूक झाली’, ते सांगून सर्वांची क्षमायाचना करा.’’
३ आ. सत्संग घेणार्या कार्यकर्त्यांनी बाळगायच्या सतर्कतेविषयी सद्गुरु काकांनी जाणीव करून देणे : आता ईश्वराच्या कृपेने मला ‘सत्संग कसा घ्यायचा ?’, हे शिकायला मिळत आहे. मला माझ्यातील स्वभावदोषांची जाणीव होऊन गुणवृद्धी करण्याची संधी मिळत आहे, त्यासाठी मी भगवान श्रीकृष्णाप्रती कृतज्ञ आहे. अन्य वेळीही सत्संग चालू असतांना सद्गुरु काका त्यांच्या कक्षात सेवेत व्यस्त असतात. सत्संगात मूळ सूत्र सोडून बोलणे होत असल्यास सद्गुरु काका त्यांच्या कक्षातून बाहेर येऊन ‘काय अयोग्य आहे ?’, हे नेमकेपणाने सांगतात. ते ‘सत्संग घेणार्या साधकाने नेतृत्व कसे केले पाहिजे’, याचीही जाणीव करवून देतात.
३ इ. ‘सत्संग घेणार्या कार्यकर्त्यांच्या साधनेची हानी होऊ नये’, याची सद्गुरु पिंगळेकाकांना असलेली तळमळ ! : सद्गुरु काकांनी साधनेत होणार्या चुकांची जाणीव करून देणारा सत्संग घेणार्या कार्यकर्त्याला सत्संगाच्या आरंभी स्वतःची चूक सांगायला सांगितली, नाहीतर ‘सत्संग घेणार्या कार्यकर्त्यात श्रेष्ठत्वाची भावना आणि एक वेगळेपणा निर्माण होऊन त्याच्या साधनेची हानी होऊ शकते’, अशी सद्गुरु काकांनी जाणीव करून दिली.
४. सद्गुरूंसमोर प्रांजळपणे चूक स्वीकारायला शिकवणे
४ अ. सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘चूक नेमकेपणाने आणि स्पष्टपणे सांगितल्यास मनाची निर्मळता वाढून त्यांना नेमकेपणाने मार्गदर्शन मिळू शकते’, असे सांगणे : एकदा एक संत मला माझ्याकडून झालेल्या चुकीची जाणीव करवून देत होते. आरंभी २ – ३ मिनिटे मला ‘चूक स्वीकारता आली’, असे वाटले; पण नंतर माझ्यातील अहंमुळे माझ्या मनात स्पष्टीकरणाचे विचार आले. दुसर्या दिवशी ‘माझी ही चूक संतांना सांगावी’, असे मला वाटले; पण त्या वेळी मी स्पष्टपणे न सांगता ‘मनात अस्वस्थता निर्माण झाली’, असे त्यांना सांगितले. तेव्हा क्षणात सद्गुरु पिंगळे काकांनी मला सांगितले, ‘‘मला चूक स्वीकारता आली नाही’, असे तुम्ही नेमकेपणे आणि स्पष्टपणे सांगायला हवे होते. त्यातून निदान मनाची निर्मळता तरी वाढू शकते आणि आपल्याला नेमकेपणाने मार्गदर्शनही मिळू शकते.’’
४ आ. एखाद्या कार्यकर्त्याने चूक मनापासून न स्वीकारल्यास सद्गुरु काकांनी सत्संगात त्याला अधिक वेळ देऊन त्याचे स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची जाणीव करून देणे : एखादा कार्यकर्ता चूक मनापासून स्वीकारत नसल्यास सद्गुरु काका त्याच्यासाठी एक ते दीड घंटा वेळ देतात. ते कार्यकर्त्याला त्याच्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची जाणीव करून देऊन त्याच्या प्रयत्नांना दिशा देतात. ते सांगतात, ‘‘एखाद्याने चूक लगेच स्वीकारल्यास त्याला अधिक दृष्टीकोन देण्याची आवश्यकता नसते; कारण मुळात त्याची स्वीकारण्याची वृत्ती असल्याने तो अंतर्मुख झालेला असतो.’’ सद्गुरु काका अशा प्रकारे आम्हाला व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने दिशा देऊन सत्संगात ‘कोणते सूत्र कसे हाताळायचे ?’, हे प्रायोगिक रूपात शिकवतात.
५. आध्यात्मिक स्तरावर शिकण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष कृतीतून शिकवणे
५ अ. संपर्काची सेवा झाल्यानंतर सद्गुरु काकांनी ‘कार्यकर्त्यांनी काय शिकावे ? निरीक्षण कसे करावे ?’, याविषयी कार्यकर्त्यांना सांगितल्याने त्यांच्यात सतर्कता आणि निरीक्षणक्षमता निर्माण होण्यास साहाय्य होणे : मला सद्गुरु काकांसह अनेक वेळा संपर्क सेवेसाठी जाण्याची संधी मिळते. संपर्कसेवा झाल्यावर आम्ही चारचाकीत बसतो. तेव्हा सद्गुरु काका लगेच विचारतात, ‘‘आज काय शिकायला मिळाले ?’’ आरंभी माझे त्यांच्या समवेत जाण्याकडे अथवा कृती उरकण्याकडे लक्ष असे. त्यामुळे ‘काय शिकायला मिळाले ?’, हे मला सांगता येत नसे. सद्गुरु काका ‘त्यांना काय शिकायला मिळाले ? आम्ही काय शिकायला हवे ? सेवेच्या वेळी निरीक्षण कसे करायचे ?’, याविषयी सांगत. त्यामुळे पुढील संपर्काच्या वेळी माझ्यात सतर्कता आणि निरीक्षणक्षमता निर्माण होण्यास साहाय्य झाले. सद्गुरु काकांनी माझ्याकडून ही प्रक्रिया सातत्याने करवून घेतल्याने आता सद्गुरु काका समवेत नसले, तरीही माझ्याकडून निरीक्षण केले जाते आणि सहसाधकांसह तसे शिकण्याचा प्रयत्न होतो.
६. सद्गुरु पिंगळेकाकांची चैतन्यमय वाणी आणि अपार प्रीती यांमुळे चारचाकी विषयीची आसक्ती सहजतेने नष्ट होणे
गुरुकृपेने मी पूर्णवेळ धर्मप्रसार करण्याचे ठरवल्यावर सेवेसाठी देहली येथे आलो आणि माझी चारचाकी अन्य ठिकाणी सेवेत रुजू झाली. आरंभी २ – ३ मासांत माझ्या मनात चारचाकीविषयी विचार येऊन आसक्ती जागृत होत असे. असे २ – ३ वेळा झाल्यावर मी त्याविषयी सद्गुरु काकांना सांगितले. त्या वेळी सद्गुरु काकांनी मला अत्यंत प्रेमाने सांगितले, ‘‘तुमची चारचाकी, म्हणजे तुमच्या कुटुंबाची एक सदस्यच आहे. आता ती प्रत्यक्ष गुरुसेवेत आहे. चारचाकी जिथे आहे, तिथून तुम्हा सर्वांना चैतन्य मिळत आहे. पुढच्या वेळी चारचाकीविषयी विचार आल्यास असा भाव ठेवा.’’
तेव्हापासून सद्गुरु काकांच्या प्रीतीमय आणि चैतन्यमय वाणीमुळे दोन वर्षांहून अधिक कालावधी होऊनही माझ्या मनात चारचाकीविषयी विचार आला नाही. किंबहुना ‘मी चारचाकी घेतली होती’, याचाच मला विसर पडला. मी काहीच प्रयत्न न करता सद्गुरूंनी माझी आसक्ती न्यून केली. त्यांनी माझी केवळ चारचाकी विषयीची आसक्ती न्यून केली, असे नव्हे, तर मला कधीही कसलीही उणीव भासू दिली नाही.
७. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. प्रत्येक सेवा परिपूर्ण करण्यासाठी झटलो, तर आनंद मिळतो.
आ. सहकार्यकर्त्यांचे साहाय्य घेतल्याने स्वतःत ‘नम्रता, लघुत्व घेणे’ आदी गुण निर्माण होऊन कार्यकर्त्यांसमवेत सहजतेने वागता येण्यास, तसेच स्वकोषातून बाहेर पडण्यास साहाय्य झाले.
इ. आध्यात्मिक स्तरावर शरणागती कशी निर्माण होते ? आणि तिचे महत्त्व लक्षात आले.
ई. ‘बुद्धी गुरुकार्यासाठी कशी अर्पण करायची ?’, हे मला शिकायला मिळाले.
उ. ‘मला येते किंवा मी करू शकतो’, ही कर्तेपणाची जाणीव नष्ट होण्यास साहाय्य झाले.
८. प्रार्थना
सद्गुरु पिंगळे काका प्रतिदिन अशा अनेक प्रसंगांतून आम्हाला शिकवत असतात. माझ्यातील ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे मी आजपर्यंत त्यांचा भगवान श्रीकृष्णाला यांना अपेक्षित असा लाभ करून घेण्यात न्यून पडलो, त्यासाठी मी परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु काका यांच्या चरणी क्षमायाचना करतो.
‘प्रत्यक्षात परात्पर गुरुदेवच मला सद्गुरु पिंगळेकाका यांच्या रूपातून अनंत करांनी (हातांनी) भरभरून देत आहेत’, ही जाणीव ठेवून त्यांची कृपा ग्रहण करण्याची पात्रता माझ्यात निर्माण होवो आणि या बालकाकडून त्या अनुरूप प्रयत्न होऊ देत’, अशी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो.’
– अज्ञानी बालक,
श्री. श्रीराम लुकतुके, देहली. (३.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |