हिंदूंविना पोरका होत चाललेला भारत !

संपादकीय

उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येला १ मास उलटला आहे. २८ जून या दिवशी महंमद गौस आणि रियाज अत्तारी यांनी कन्हैयालाल यांचा शिरच्छेद केला. नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲपवरून पोस्ट केल्यामुळे हे निर्दयी कृत्य करण्यात आले. दोघा जिहाद्यांचे अन्वेषण चालू असून ‘त्यांना फासावर लटकवले जाईल’, अशी हिंदूंना आशा आहे. या घटनेचा संबंध ‘दावत-ए-इस्लामी’ या पाकमधील आतंकवादी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे. ही एक घटना नसून नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ जो जो विचार मांडत आहे, त्या त्या हिंदूला जीव गमवावा लागत आहे. अमरावती येथील डॉ. उमेश कोल्हे यांची हत्या, सीतामढी (बिहार) येथील अंकित झा या हिंदु तरुणावरील जीवघेणे आक्रमण, भोपाळ येथील निशांक राठौर या विद्यार्थ्याची हत्या अथवा आता कर्नाटकातील बेळ्ळारे येथे भारतीय जनता युवा मोर्च्याचे नेते प्रवीण नेट्टारू यांची हत्या, ही त्याची ज्वलंत उदाहरणे ! प्रवीण नेट्टारू यांनी कन्हैयालाल यांचे समर्थन करणारी एक फेसबूक पोस्ट केली होती.

प्रवीण नेट्टारू

‘भारतातील २५ राज्यांतील ३०० लोक हे ‘दावत-ए-इस्लामी’च्या १८ आतंकवाद्यांच्या संपर्कात आहेत’, असे कन्हैयालाल यांच्या हत्येच्या अन्वेषणातून समोर आले. त्यामुळे या हत्यासत्रांचे अंगुलीनिर्देश या संघटनेकडे जातात. तसेच जे जे ‘यू ट्यूबर्स’, ‘ब्लॉगर्स’, प्रथितयश अधिवक्ते अथवा हिंदुत्वनिष्ठ यांनी गेल्या २ मासांत नूपुर शर्मा यांच्यासाठी आवाज उठवला, त्या त्या प्रत्येकाने स्वत:चा जीव मुठीत धरून बसावे ! एखाद्या रहस्यमय चित्रपटामध्ये ‘पुढील हत्या कुणाची होणार ?’, अशी स्थिती असते, त्याप्रमाणे ‘नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍यांपैकी आता कुणाचा क्रमांक लागणार ?’, याची जीव मुठीत धरून वाट बघावी लागत आहे. बहुसंख्य; परंतु असाहाय्य हिंदूंच्या देशाचे हे भयावह दुर्दैवच !

जिहाद आणि फ्रान्स !

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येतून ३ ज्वलंत प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्नाटकात आणि केंद्रात हिंदुत्वनिष्ठ भाजपची सत्ता असतांना भाजयुमोच्या नेत्याची हत्या होणे, यातून सत्ताधारी पक्षातील नेते जिथे असुरक्षित, तिथे सर्वसामान्य हिंदूंची काय कथा ? हा पहिला प्रश्न ! या प्रकरणाच्या पाठीशी जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही तीच संघटना जिने भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी वर्ष २०४७ ची समयमर्यादा ठेवून त्यासाठी चक्क एक ‘ब्लू प्रिंट’ (नियोजनाचा आराखडा) सिद्ध केली आहे. यासाठी ती अनेक राज्यांतील धर्मांध मुसलमानांना सैनिकी प्रशिक्षणही देत आहे. ‘एवढे होऊन तिच्यावर बंदी का लादली जात नाही ?’ हा दुसरा प्रश्न ! नेट्टारू यांच्या हत्येवर प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि सर्वाेच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी अत्यंत बोलके अन् विचारप्रवण करण्यास लावणारे ट्वीट केले आहे. ते म्हणाले, ‘‘निंदा केल्याने, पुतळे जाळल्याने, मोर्चे काढल्याने, (हत्या झालेल्या हिंदूंचे) छायाचित्र प्रसारित केल्याने, ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याने, ‘ट्विटर ट्रेंड’ केल्याने, प्रसारमाध्यमांमध्ये चर्चासत्र आयोजित केल्याने, फाशीची मागणी केल्याने, पीडित कुटुंबाला आर्थिक साहाय्य केल्याने अथवा हनुमान चालिसाचे पठण केल्याने ‘जिहाद’चा अंत होऊ शकत नाही ! लोखंडाला लोखंडच कापू शकते ! त्यामुळे जिहादी आक्रमणांवर कठोरात कठोर जिहादविरोधी कायदा करणेच एकमेव मार्ग आहे !’’ यातून जिहादविरोधी कायदा करण्याचा सरकार विचार करत आहे कि हिंदूंना जिहाद्यांच्या ‘सर तन से जुदा’ या मोहिमेच्या हवाले सोडण्यात धन्यता मानणार आहे ? हा तिसरा प्रश्न !

फ्रान्समध्ये ‘सॅम्युएल पॅटी’ या शिक्षकाचा त्याच्या जिहादी विद्यार्थ्याने शिरच्छेद केल्यावर जिथे ‘पुरोगामी’ फ्रान्सने जिहाद आणि मदरसे-मशिदी यांना पायबंद घालणारे तब्बल ५ कायदे बनवले, तिथे हिंदुत्वनिष्ठ समजल्या जाणार्‍या भारतीय सरकारने कणखर होऊन जिहाद्यांचे अन्वेषण करून त्यांच्या पाठीशी असलेल्या व्यवस्थेचा शोध लावून जिहाद्यांना एका निश्चित समयमर्यादेच्या आत फाशी देणे अत्यंत आवश्यक आहे !

स्वसंरक्षण आवश्यक !

अनेक हिंदू मारले गेले; परंतु त्यावरून ‘लोकशाहीची हत्या’, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याची हत्या’, ‘विचारस्वातंत्र्याची हत्या’, असे रडगाणे कुणाला गावेसे वाटले नाही. एम्.एम्. कलबुर्गी आणि दादरीतील ‘मुसलमान’ अखलाक यांची हत्या झाल्यावर अश्रू ढाळणार्‍या अन् संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत ‘असहिष्णुता मार्च’ काढणार्‍या काँग्रेसला हिंदूंच्या हत्यांविषयी काय म्हणायचे आहे ? देशातील ‘इलीट क्लास’ म्हणजेच बुद्धीजीवी लेखक, पत्रकार, उद्योगपती, अधिवक्ते आदींची ‘प्रतिष्ठित’ टोळी पंचतारांकित हॉटेल्समध्ये निवांत बसली आहे. या सर्वांना त्यांच्या दुटप्पीपणावर समस्त हिंदु जनतेने वैध मार्गाने खडसावणे आवश्यक आहे. अन्यथा पाकिस्तान-बांगलादेश येथील हिंदूंची जी व्यथा झाली, ती काही दशकांत भारतीय हिंदूंची होईल. या दृष्टीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी २० ते २५ वर्षांपूर्वी केलेले एक सूचक वक्तव्य आज अधिक यथार्थ आहे. एका कार्यक्रमात एका युवतीने, ‘आज मोर्चे, दंगली यांमध्ये युवा पिढी सर्वांत पुढे असते, तरी तुम्ही तिला कोणता संदेश देऊ इच्छिता ?’, असा प्रश्न विचारला होता. त्यावर बाळासाहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले होते, ‘जर देशाचा कायदा तुमचे रक्षण करण्यास समर्थ ठरत नसेल, तर तुम्हाला स्वत:चे रक्षण करण्याचा अधिकार आहे !’ यातील गर्भितार्थ हा ‘प्रत्येकाने शस्त्र हातात घेऊन हिंसाचार करणे’, अपेक्षित नसून स्वसंरक्षणार्थ सक्षम बनणे आवश्यक आहे. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेला जीवन जगण्याचा अधिकार पहाता स्वसंरक्षणास प्रयत्न करण्याला कायद्याची आडकाठी नाही. त्यामुळे आतातरी हिंदूंनी संघटन करावे, सक्षम व्हावे आणि स्वधर्म अन् हिंदु समाज यांचे रक्षण करण्यास कटीबद्ध व्हावे, अन्यथा ही पुण्यभूमी असलेली भारतभूमीही तुम्हाला पोरकी होईल, हे विसरू नका !

हिंदूंनो, तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणार्‍या जिहाद्यांशी दोन हात करण्यासाठी संघटित व्हा !