निरपेक्ष आणि सतत दुसर्‍यांचा विचार करणार्‍या (कै.) सौ. शालिनी मराठे !

सौ. शालिनी मराठेकाकूंच्या समवेत मी रामनाथी आश्रमात एकाच खोलीत अनेक वर्षे राहिले आहे. त्या वेळी त्यांचे लक्षात आलेले गुण पुढे दिले आहेत.

(कै.) सौ. शालिनी मराठे

१. स्वावलंबी असणे

१ अ. स्वतःची सर्व कामे स्वतः करणे : काकूंचे वय ७४ वर्षे होते. त्यांना मधुमेह, पाठदुखी, ‘फ्रोझन शोल्डर’(खांद्याचे दुखणे), हृदयविकार, असे अनेक आजार होते, तरीही त्या कुठेही सवलत घेत नसत. त्या स्वतःची सर्व कामे स्वतः करत.

सौ. देवी कपाडिया

१ आ. शारीरिक त्रास होत असतांनाही भोजनकक्षात जाऊन अल्पाहार घेणे : त्यांना सकाळी शारीरिक त्रास होत असे. तेव्हा त्यांना अल्पाहार घेण्यासाठी उठायला त्रास व्हायचा. त्या वेळी ‘मी तुमच्यासाठी खोलीत अल्पाहार घेऊन येते’, असे सांगितल्यावर त्या ‘नको’, असेच म्हणत आणि स्वतः उठून भोजनकक्षात जाऊन अल्पाहार घेत असत.

१ इ. रुग्णाईत असतांनाही स्वतःचे कपडे स्वतः धुणे : त्या रुग्णाईत असतांनाही स्वतःचे कपडे स्वतःच धुऊन वाळत घालत असत. काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) त्या पुष्कळ रुग्णाईत होत्या. त्यांना रुग्णालयात चाचणीसाठी जावे लागायचे. तेथून आल्यावर त्या त्यांचे कपडे मला धुवायला न देता स्वतःच धुलाईयंत्रात टाकत असत आणि वाळतही स्वतःच घालत असत.

२. अपेक्षा नसणे

कधी नियोजित साधिकेला खोलीची स्वच्छता करणे जमले नाही, तर त्या काही अपेक्षा न करता स्वतःला जमेल, तसा केर काढत आणि खोली पुसत. त्या वेळी ‘साधिकेला काही तातडीची सेवा असेल, तर तिला ताण येऊ नये’, असा त्यांचा विचार असायचा.

३. प्रेमभाव

मी सध्या आश्रमाजवळ घर घेतले आहे. मी तेथेच रहाते. आश्रमात सेवेसाठी गेले की, मी त्यांना भेटायला जायचे. त्या वेळी त्या मला त्यांच्याकडे असलेला लाडू, चकली इत्यादी खाऊ आवर्जून देत असत. पुष्कळ रुग्णाईत असतांना एकदा मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांनी माझा निरोप घेतांना माझ्या हातात २ सफरचंदे ठेवली. त्या वेळी मला त्यांचे प्रेम पाहून भावाश्रू आले.

४. दुसर्‍यांचा विचार करणे 

अ. काही वर्षांपूर्वी काकूंचे पुष्कळसे दात काढले होते. तेव्हा एका साधिकेने त्यांना  ‘तुम्ही स्वयंपाकघरात तुमच्यासाठी काही मऊ जेवण बनवायला सांगा’, असे सुचवले. त्या वेळी काकू सर्वांसाठी असलेले जेवण ताटात वाढून घ्यायच्या. त्या पोळी आमटीत भिजवून खायच्या. ‘इतरांना आपल्यामुळे काही वेगळा वेळ द्यावा लागला’, असे त्यांना वाटायचे.

आ. काही मासांपूर्वी त्यांना पुष्कळ रक्तस्राव होत होता. तेव्हा त्यांना ‘आधुनिक वैद्यांना खोलीत तपासणीसाठी बोलावून घेऊया’, असे मी सुचवले; परंतु त्या चाकांच्या आसंदीवर (‘व्हीलचेअर’वर) बसून आधुनिक वैद्यांकडे गेल्या. तेव्हा ‘आश्रमात अनेक साधक आहेत, तर आधुनिक वैद्य किती जणांकडे जाणार ?’, असा त्यांचा विचार होता. त्या वेळी ‘या वयात आणि असा गंभीर आजार असतांनाही त्यांचा ‘इतरांचा विचार करणे’ हा गुण किती प्रबळ आहे !’ याचे मला फारच कौतुक वाटले.

इ. त्या आश्रमात होत असलेल्या मंत्रपठणात नियमितपणे सहभागी असायच्या. त्यांना बरे वाटत नसतांनाही त्या पठणाला उपस्थित असायच्या. ‘आपल्यामुळे दायित्व असलेल्या साधकांचा अन्य साधक शोधण्यात वेळ जाऊ नये’, असे त्यांना वाटायचे.

५. अप्रतिम लेख लिहिणे

काकू कुठल्याही विषयावर अप्रतिम लेख लिहीत असत. ही काकूंना देवाने दिलेली देणगी होती. त्यांचे लेख आणि कविता भावपूर्ण असायच्या. त्या ‘इतरांना विषय समजेल’, अशा शैलीत लेख लिहायच्या.

हे श्रीकृष्णा, मला सौ. शालिनी मराठेकाकू यांच्यासारख्या साधिकेसह रहायला मिळाले आणि त्यांचे गुण शिकायला मिळाले, यासाठी मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘त्यांचे गुण आमच्या अंगी येऊ देत’, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करते.’

(‘हे लिखाण सौ. शालिनी मराठे यांच्या निधनापूर्वीचे आहे; म्हणून त्यांच्या नावापूर्वी (कै.) लावला नाही.’ – संकलक)

– सौ. देवी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ७० वर्षे), फोंडा, गोवा. (१४.७.२०२२)