दुहेरी नागरिकत्वाच्या निकषांविषयी गोव्यात शासकीय स्तरावर अजूनही सुस्पष्टता नाही !

पणजी, २६ जुलै (वार्ता.) – गोव्यात दुहेरी नागरिकत्वाचे एकही प्रकरण नसल्याची माहिती दोन्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. गोव्यातील दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणात लवकर अन्वेषण करून अहवाल देण्याचा आदेश केंद्रीय  गृहमंत्रालयाने राज्यशासनाला नुकताच दिला आहे.

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोटावाळे म्हणाले, ‘‘दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित एखादी तक्रार आल्यावर जिल्हाधिकार्‍यांना या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकण्याचा आणि त्यासंबंधी अहवाल शासनाच्या अनुमतीने केंद्राला पाठवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे; मात्र गोव्यात आतापर्यंत दुहेरी नागरिकत्व नाकारण्यात आलेले एकही प्रकरण नोंद नाही. (शासनाने तक्रारीची वाट न पहाता दुहेरी नागरिकत्वाविषयी स्वतःहून अन्वेषण करणे अपेक्षित ! – संपादक) वास्तविक दुहेरी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावे सुपुर्द करावे लागणे, ही तक्रारदारासाठी पुष्कळ कठीण गोष्ट आहे. त्याचप्रमाणे पोर्तुगालचे ओळखपत्र असलेला किंवा ज्याची जन्मनोंदणी पोर्तुगालमध्ये झाली आहे त्याला कि ज्याने पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले आहे त्याला दुहेरी नागरिकत्व म्हणायचे ? याविषयी सुस्पष्ट माहिती उपलब्ध नाही. दक्षिण गोव्यात दुहेरी नागरिकत्वाला आव्हान देणारी एकही तक्रार आलेली नाही.’’