तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २३ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील अतीप्राचीन असलेल्या घाटशीळ मंदिराच्या परिसरातील शिखर आणि तटबंदी यांवर लहान आकाराची झुडुपे उगवली आहेत. या झुडुपांमुळे वास्तूला तडे जात असून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने तात्काळ शिखर आणि तटबंदी यांवरील झुडुपे काढावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. (मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! अशी मागणी भाविकांना का करावी लागते ? – संपादक)
तुळजापूर शहराच्या प्रवेशद्वाराशी डोंगराच्या बाजूला घाटशीळ मंदिर आहे. मंदिरामध्ये मोठी दगडी शिळा असून अश्विनी पौर्णिमेच्या दिवशी पायी चालत येणारे भक्त घाटशीळेचे दर्शन घेऊन मगच देवीच्या दर्शनाला जातात. येथील शीळेवर श्री तुळजाभवानी देवी आणि प्रभु श्रीराम यांची भेट झाली असल्याचे सांगितले जाते.