श्री दत्तगुरूंच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे निर्गुणाची अनुभूती देणारे पाद्यपूजन !

गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी । श्री दत्तात्रेय रूपातील गुरुदर्शनाची संधी । दिव्य पाद्यपूजनाने सार्थक होती । साधकजन गुरुचरणी लीन होती ।।

गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! गुरु आपल्या शिष्यांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हीच खरी गुरुपौर्णिमा ! ज्यांना साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले गुरुरूपात मिळाले, अशा सनातनच्या साधकांसाठी कृतज्ञतेची याहून दुसरी पर्वणी ती कोणती ? यंदाची गुरुपौर्णिमा साधकांना निर्गुणाची अनुभूती देणारी ठरली, ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या श्री दत्तगुरूंच्या रूपातील दर्शनाने आणि त्यांच्या पाद्यपूजनामुळे ! सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने १३ जुलै २०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना श्री दत्तगुरूंच्या रूपात दर्शन दिले. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या या भक्तीमय महोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपातील गुरुदेवांची सप्तर्षींच्या आज्ञेने पाद्यपूजा केली.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्रच्या साधकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे सोहळ्याचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करण्यात आले. प्रारंभी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथे झालेल्या दिव्य मंगलमय रथोत्सवाची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. प्रत्यक्ष श्रीगुरूंनी साधकांना दिलेल्या दर्शनाने साधक कृतज्ञ झाले. त्यानंतर साधकांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सामूहिकरित्या केला. या वेळी साधकांना आध्यात्मिक स्तरावर अनुभूती आल्या.

नामजपाच्या माध्यमातून श्री दत्तगुरूंना आळवल्यानंतर साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देऊन कृतकृत्य केले ! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लाभलेले गुरुदर्शन आणि त्यांचे पाद्यपूजन साधकांनी मनमंदिरात कोरून ठेवले ! या सोहळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.


श्री पाद्यपूजन सोहळ्यात सप्तर्षींच्या वचनाची प्रचीती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणांवर पुष्पे अर्पण करतांना डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गुरुदेवांच्या चरणांवर पुष्पार्चना केल्यानंतर श्री दत्ततत्त्वाला जागृती येणे : ‘‘ॐ ऐं क्लीं श्रीं श्रीं श्रीं सच्चिदानन्द-परब्रह्मणे नमः ।’ या मंत्रघोषाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दत्ततत्त्व मोठ्या प्रमाणात जागृत होईल’, असे सप्तर्षींनी सांगितले होते. त्याची प्रचीती साधकांना आली. सोहळ्यात गुरुदेवांचे श्री दत्तगुरूंच्या रूपात पूजन असल्यामुळे वातावरणात पहिल्यापासूनच निर्गुण तत्त्व जाणवत होते. अशा निर्गुण वातावरणात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘ॐ ऐं क्लीं श्रीं श्रीं श्रीं सच्चिदानन्द-परब्रह्मणे नमः ।’ या मंत्रघोषात १०८ वेळा गुरुदेवांच्या चरणांवर पुष्पार्चना केल्यानंतर वातावरणात पालट झाला. त्यानंतर वातावरणात शांतीची स्पंदने अधिक प्रमाणात जाणवू लागली. ‘मंत्रघोषातील पुष्पार्चनेनंतर श्री गुरुदेवांमधील दत्तात्रेयाच्या तत्त्वाला जागृती आली’, हे उपस्थित साधकांनी प्रत्यक्ष अनुभवले.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) (१३.७.२०२२)

सूत्रसंचालकाने ‘मोक्षस्थान’ हा शब्द उच्चारताच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हारातील मोगर्‍याची २ फुले खाली पडणे

‘श्री दत्तगुरूंच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पाद्यपूजन पार पडल्यावर सूत्रसंचालक श्री. विनायक शानभाग यांनी त्या कोमल चरणांची स्तुती केली. या वेळी ‘हे गुरुदेव, आपले हे चरणच आम्हा साधकांचे गंतव्यस्थान, आमचे मोक्षस्थान आहेत’, असे ते म्हणाले. जेव्हा त्यांनी ‘मोक्षस्थान’ हा शब्द उच्चारला, तेव्हाच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गळ्यात घातलेल्या मोगर्‍याच्या पुष्पहारातील २ पुष्पे त्यांच्या चरणांवर पडली. मी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांचेही लक्ष बरोबर त्याच वेळी त्या फुलांकडे गेले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे मोक्षगुरु आहेत. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी साधकांचे जीवनध्येय असलेल्या ‘मोक्षस्थान’ या शब्दाच्या वेळीच श्री गुरूंच्या हारातील फुले पडणे, हा साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी श्री दत्तगुरु रूपातील गुरुदेवांकडून मिळालेला मोठा आशीर्वाद आहे.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१३.७.२०२२)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणांवर वाहिलेल्या फुलांची उंची एकसमान असणे

दोन्ही चरणांवर वाहिलेल्या फुलांची उंची एकसमान दिसते !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गुरुदेवांच्या चरणांवर पुष्पे अर्पण केली. शेवटी गुरुदेवांच्या दोन्ही चरणांवर वाहिलेल्या फुलांची उंची एकसमान असल्याचे दिसून आले.

चरणांवर वाहिलेली काही फुले नंतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांखाली असलेल्या पाटावरून खाली पडत होती. ती फुले खाली पडतांनाही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या बाजूचे एक फूल खाली पडले की, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्याही बाजूच्या चरणांवरील एक फूल खाली पडत होते. त्यातही एकसमानता दिसून आली.’

– सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (१५.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक