सप्तर्षींच्या आज्ञेने वस्त्र परिधान केल्यानंतर देहात देवीतत्त्व जागृत झाल्याच्या संदर्भात श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना आलेल्या दिव्य अनुभूती !

‘सप्तर्षींच्या आज्ञेने १३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकांना श्री दत्तात्रेय रूपात दर्शन दिले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या मार्गदर्शनात सप्तर्षींनी सांगितले होते, ‘‘श्री महालक्ष्मीदेवीची कांती सुवर्णासारखी आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक असल्याने त्यांनी सुवर्ण रंगाची रेशमी साडी नेसावी. श्रीचित्‌‌शक्ति ही देवी सरस्वतीशी संबंधित आहे. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामध्ये श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व अधिक असल्याने त्यांनी पांढर्‍या रंगाची रेशमी साडी नेसावी.’’सप्तर्षींच्या आज्ञेने आम्ही त्या त्या तत्त्वांची साडी नेसली. सप्तर्षींच्या आज्ञेने सुवर्ण रंगाची साडी नेसतांना पुष्कळ दिव्य अनुभूती आल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची आरती करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. स्वतःसंदर्भात आलेल्या अनुभूती

१ अ. सुवर्ण रंगाची साडी नेसण्यास आरंभ केल्यापासूनच स्वतःमध्ये देवीतत्त्व पुष्कळ प्रमाणात जागृत होत असल्याचे अनुभवता येणे

अ. नेसण्यासाठी साडी हातात घेतल्याक्षणीच पुष्कळ शहारे आले.

आ. साडी नेसत असतांनाच ‘स्वतःमध्ये देवीतत्त्व पुष्कळ प्रमाणात जागृत होत आहे’, असे प्रकर्षाने अनुभवता येत होते.

इ. पूजनासाठी जातांना मला दूरूनच पाहूनही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आवाक् झाल्या. त्या वेळी त्यांच्याही अंगावर पुष्कळ शहारे आले. त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्याकडे पाहून सहन होत नाहीत, एवढे शहारे येतात. साक्षात् श्री महालक्ष्मीची सुवर्ण कांतीच अवतरली आहे !’’

ई. ती साडी नेसल्यानंतर माझ्या देहातील प्रत्येक पेशी-पेशीत, रोम-रोमात हलकेपणा जाणवत होता. देह वायूरूप झाल्याप्रमाणे हलकेपणा जाणवत होता.

स्वतःच्या देहात देवीतत्त्व जागृत झाल्याची अनुभूती यापूर्वी आली आहे; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने श्री महालक्ष्मीच्या सुवर्ण रंगाची साडी नेसतांना आलेली अनुभूती शब्दातीत आहे. त्या दिवशी जे अनुभवता आले, ते दिव्य आणि अलौकिक होते. ती तत्त्वजागृतीची स्थिती २ दिवस अनुभवता आली.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासंदर्भात आलेल्या अनुभूती

२ अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून ‘वीणाधारी हंसवाहिनी श्री सरस्वतीदेवीचे दर्शन घेत आहे’, असे जाणवणे आणि पाद्यपूजनानंतर सप्तर्षींनी गायनसेवा करण्यास सांगितल्यावर त्याचा उलगडा होणे : सप्तर्षींच्या आज्ञेने श्वेत (पांढर्‍या) रंगाची साडी नेसलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहिल्यावर मला पांढराशुभ्र प्रकाश दिसला. त्यांना पाहून हंसवाहिनी आणि वीणाधारी श्री सरस्वतीदेवीचेच दर्शन घेत आहे’, असे मला जाणवले. पाद्यपूजन झाल्यानंतर सप्तर्षींनी सांगितले की, ‘आजच्या सोहळ्यात सरस्वतीतत्त्वही अवतरले आहे. त्यामुळे श्री सरस्वतीदेवीची स्तुती करणारे गीत गुरुदेवांसमोर सादर करावे.’ त्या वेळी ‘मला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) काकूंच्या हातात वीणा का दिसली ?’, याचा उलगडा झाला.’

सप्तर्षी विशिष्ट सोहळ्याच्या वेळी विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगतात, त्याचेही आध्यात्मिक स्तरावर महत्त्व किती आहे, हे या अनुभूतींतून लक्षात येते. वस्त्रांच्या माध्यमातून देवीतत्त्वाच्या जागृतीची दिव्य अनुभूती देणारे सप्तर्षी आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२१.७.२०२२)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पाद्यपूजन सोहळ्याच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती !

१. पुष्पार्चना करतांना ‘फुलांतील प्राण जागृत होऊन ती फुले समर्पित होण्यास आतुर झाली आहेत’, असे जाणवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणांवर ‘ॐ ऐं क्लीं श्रीं श्रीं श्रीं सच्चिदानन्द-परब्रह्मणे नमः ।’ हा मंत्रजप करत पुष्पार्चना करतांना ‘प्रत्येक फुलातील प्राण जागृत झाला आहे’, असे जाणवत होते. फुले सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी समर्पित होण्यासाठी आतुर झाली होती. पुष्पार्चना करतांना त्या प्रत्येक फुलाचा समर्पणभाव आणि आनंद अनुभवता येत होता.

२. स्थळ, काळ आणि वेळ यांच्या पलीकडील अनुभूती देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे पाद्यपूजन !

२ अ. पाद्यपूजनस्थळी निर्माण झालेल्या निर्गुण स्तरावरील वातावरणामुळे ‘तेथे दत्तलोकच अवतरला आहे’, असे वाटणे : पाद्यपूजन सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची निर्गुणावस्था होती. आम्ही (मी आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी) पूर्णवेळ ध्यानावस्था अनुभवली. पूजन चालू असतांना श्री दत्ततत्त्वाचा प्रवाह अनुभवता येत होता. पूजनस्थळी इतके निर्गुण स्तरावरील वातावरण निर्माण झाले होते की, ‘श्री दत्तात्रेय रूपातील श्री गुरूंचा पाद्यपूजन सोहळा हा भूलोकात नव्हे, तर दत्तलोकातच झाला’, असे अनुभवता आले.

२ आ. सोहळा चालू होण्याची वेळ पुढे जाऊनही तो नियोजित वेळेतच आणि यथासांग पूर्ण होणे, ही दैवी लीला ! : पाद्यपूजन सोहळ्याचे नियोजन करतांना आम्ही प्रत्येक कृतीला किती मिनिटे लागतात, त्याचे अभ्यासपूर्ण नियोजन केले होते. काही कारणाने सोहळा आरंभ होण्याची वेळ पुढे गेली, तरी पाद्यपूजन सोहळा नियोजित वेळेतच पूर्ण झाला. वास्तविक आरंभ होण्याची वेळ पुढे गेली; म्हणून वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजनात कोणतीही तडजोड केलेली नव्हती. पाद्यपूजन सोहळ्यातील विधींचे जसे नियोजन केले होते, त्याच प्रकारे यथासांग आणि भावपूर्ण वातावरणात पूजन करण्यात आले. असे असूनही सोहळा नियोजित वेळेत पूर्ण झाला. ‘काळ आणि वेळ यांवरही श्री दत्तगुरूंचेच प्रभुत्व होते’, ही दैवी लीलाच अनुभवता आली.

२ इ. पाद्यपूजन झाल्यानंतरही ‘सोहळा चालूच आहे’, असेच वाटत होते. तीच ध्यानस्थिती नंतरही अनुभवता येत होती. जणू ‘काळ थांबला आहे’, अशी ती अनुभूती होती.

अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य पाद्यपूजन सोहळ्याद्वारे स्थळ, काळ आणि वेळ यांच्या पलीकडील अनेक अलौकिक अनुभूती अनुभवता आल्या. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्री दत्तात्रेय रूपात दर्शन देऊन साधकांना आध्यात्मिक उन्नतीसाठी मोठा आशीर्वादच दिला आहे. या दिव्य अनुभूतींतून अध्यात्मातील पुढचे पुढचे टप्पे अनुभवण्यास देणारे साक्षात् भगवंतस्वरूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणकमली अनंत कोटी कृतज्ञता !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२१.७.२०२२)