नाशिक – यशवंत चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या ‘राज्यशास्त्र’ या विषयाच्या १२ जुलै या दिवशी झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत मनुस्मृतीच्या संदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी आहे. या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने ‘राज्यघटनेविरोधी ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले योगदान सांगा’, अशा प्रश्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. यातून विद्यापिठाने ‘मनुस्मृती’चे उदात्तीकरण केले आहे. त्याचसमवेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिण्यात आलेल्या खोट्या इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे’, असे सांगून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) याचा निषेध नोंदवला आहे.
भाकपने म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांची भेटच झाली नाही, असे अनेक इतिहास संशोधकांनी सांगितले आहे. न्यायालयाने १६ जुलै २०१८ या दिवशी संभाजीनगर खंडपिठाने दिलेल्या निकालात नमूद केले आहे.
राज्यात पुस्तकाची होळी करण्याची चेतावणी !राज्यघटनेविरोधी मनुस्मृती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास लिहिणारी अभ्यासक्रम समिती रहित करून त्यांच्यावर कारवाई करावी. अभ्यासक्रमातील इतिहासद्रोही, तसेच घटनाविरोधी लिखाण तात्काळ मागे घ्यावे आणि प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांविषयी यशवंत चव्हाण मुक्त विद्यापिठाने जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी भाकपने केली आहे. ‘ही मागणी पूर्ण न केल्यास राज्यात पुस्तकाची होळी करण्यात येईल’, अशी चेतावणी भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉग्रेड राजू देसले आणि भाकपचे नाशिक येथील सचिव कॉम्रेड महादेव खुडे यांनी दिली आहे. |