पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १० जुलै (वार्ता.) – सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेला ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हा उपक्रम कार्यक्षमपणे राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ अंतर्गत विजेत्या कार्यालयास करण्यात आलेल्या पारितोषिक वितरणाच्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार तानाजी सावंत, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, संबंधित तहसीलदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले, ‘‘कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि पोषक असल्यास शासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढते. याचा लाभ प्रशासनासह सामान्य जनतेलाही होतो, यामुळे प्रशासनाचे काम सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास साहाय्य होऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते.’’
‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम अन्यांसाठी प्रेरणादायी ठरेल ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
या अभियानाला लोकसहभागही लाभला. लोकसहभागातून ७ तलाठी आणि ३ मंडळ अधिकारी कार्यालयांचे नव्याने बांधकाम केले. मोडकळीस आलेल्या ३३ तलाठी आणि ८ मंडळ अधिकारी कार्यालयाचेही बांधकाम केले. कार्यालयात सोयी-सुविधा, स्वच्छता असल्याने नागरिक, कर्मचारी समाधान व्यक्त करत आहेत. त्यामुळे अभियान अन्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या वेळी केले.