परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना पाहिलेले नसूनही एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. प्रिया प्रभु यांना आलेली त्यांच्या संदर्भातील अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे स्वप्नात दर्शन होणे

माझी आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची एकदाही भेट झालेली नाही, तरीही त्यांच्याच कृपेने माझी त्यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांच्या अध्यात्मप्रसाराच्या दैवी कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. जुलै २०२० च्या शेवटच्या आठवड्यात एकदा परात्पर गुरु डॉक्टर आठवले माझ्या स्वप्नात आले. ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील त्यांच्या खोलीत त्यांच्या पटलाजवळ आसंदीवर बसले होते. मी आजपर्यंत त्यांची खोली कधीही पाहिलेली नाही.

सौ. प्रिया प्रभु

२. रुग्णाईत वडिलांना दिलेल्या औषधांचा त्यांच्यावर विपरित परिणाम होत असल्याने ती पालटून घेण्यास परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वप्नात आधुनिक वैद्य लिहून देतात, तशी औषधांची सूची दाखवली आणि त्यांनी मला सांगितले, ‘तुझ्या आईला दूरभाष करून वडिलांना दिलेले नवीन औषध त्यांच्या शरिरात विषासारखे काम करत असल्याने ते पालटून घेण्यास सांगावे.’ त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर उभे राहिले आणि ते मला आनंदाने अनेक गोष्टी सांगू लागले; परंतु मला त्यातील काहीच कळत नव्हते. त्यांची स्वप्नात भेट झाल्याने मला पुष्कळ आश्चर्य वाटत होते आणि ‘ते किती मनमोहक दिसतात’, याचाच मी विचार करत होते.

३. प्रत्यक्षातही वडिलांना दिलेल्या नवीन औषधाने पायांना सूज आल्याने आधुनिक वैद्यांनी ते औषध पालटून दिल्याचे कळणे

दुसर्‍या दिवशी सायंकाळी मी माझ्या आईला दूरभाष करून ‘अलीकडच्या काळात आधुनिक वैद्यांनी वडिलांचे औषध पालटले आहे का ?’, याविषयी विचारणा केली. त्यावर आईने मला सांगितले, ‘‘आधुनिक वैद्यांनी अलीकडेच औषध पालटले होते. त्यामुळे वडिलांच्या दोन्ही पायांना सूज येत होती. याविषयी मुलाने आधुनिक वैद्यांना कल्पना दिली आणि त्यांनी आता नवीन औषधे दिली आहेत. आता त्यांची प्रकृती बरी आहे.’’ त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काहीतरी अघटित घडण्यापासून आम्हाला वाचवले. तेच माझे आणि माझ्या कुटुंबियांचे रक्षण करत आहेत’, याची मला जाणीव झाली.

मी पुष्कळ भाग्यवान आहे; कारण मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन झाले. त्यांचे दर्शन होणे अविश्वसनीय असले, तरीही ते सत्य आहे. मी ही अनुभूती कायमस्वरूपी हृदयात जतन करून ठेवीन. कृतज्ञता परम पूज्य !’

– सौ. प्रिया प्रभु, एडमंड, ओक्लाहोमा, अमेरिका. (जुलै २०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक