अंतर्मुख, प्रगल्भ विचारांची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) !
दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य !‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील ?’, या विचाराने त्यांच्या मुलांना साधना करण्यास विरोध करतात; परंतु ते लक्षात घेत नाहीत की, हे नातेवाईक केवळ याच जन्मातील आहेत. पालकांनी ‘जन्मोजन्मींचे नाते असणार्या देवाला काय अपेक्षित आहे ?’, याचा प्रथम विचार केला पाहिजे आणि मुलांना साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य केले पाहिजे. ती त्यांची साधनाही होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१) |
कु. प्रार्थना पाठक आणि कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) या दोघी दैवी बालके अन् दैवी युवा साधक यांचा सत्संग घेतात. त्या वेळी कु. प्रार्थना पाठक हिची कु. अपालाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. दैवी सत्संग घेतांना कु. प्रार्थना हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. दैवी सत्संग घेतांना सदैव कृतज्ञताभावात असणारी कु. प्रार्थना ! : मला आणि कु. प्रार्थनाला ‘दैवी सत्संग’ घेण्याची सेवा मिळाली आहे. त्यासाठी प्रार्थना सतत कृतज्ञताभावात असते. ती सत्संग घेण्यास आरंभ करतांना नेहमी म्हणते, ‘‘गुरुदेवा, हा सत्संग म्हणजे तुमच्या चरणांवरचे एक पुष्पच आहे. ही गुरुमाऊलींचीच वाणी आहे.’’
१ आ. दैवी सत्संगात ‘निर्जीव वस्तूंतील भाव कसा असतो ?’, याविषयी भावप्रयोग घेणे : दैवी सत्संगात ती घेत असलेल्या भावप्रयोगातील भावविश्व इतके सुंदर असते की, असे कधीच कुणी अनुभवले नसेल. दैवी सत्संगातील भावप्रयोगात ती ‘निर्जीव वस्तूही परात्पर गुरुदेवांचे कसे स्मरण करतात ? आणि आश्रमातील प्रत्येक निर्जीव वस्तू किती शरणागत स्थितीत असते’, यांविषयी भावप्रयोग घेते.
१ इ. अनुभूती : ती दैवी सत्संगात भावप्रयोग सांगत असतांना मला मध्ये मध्ये सूक्ष्मातून सुगंध येतो.
२. कु. प्रार्थनाने सत्संगात सांगितलेली काही सूत्रे
२ अ. नामजप करण्याचे महत्त्व : तिला नामजप करण्याचे पुष्कळ गांभीर्य आहे. तिने सत्संगात सांगितले, ‘‘नामजप केल्याने स्वतःला जो आनंद मिळतो, तो अन्य वेळी कधीच अनुभवता येणार नाही. त्यामुळे नामजप करण्यासाठी सर्वांनी वेळ देऊया आणि तो भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करूया.’’
२ आ. इतरांचा विचार करणे : साधकांनी इतरांचा विचार वाढवण्याच्या संदर्भात ती म्हणाली, ‘‘इतरांचा विचार केल्यावर आपल्याला जो आनंद मिळतो, तो पुष्कळ मोठा आहे. संत, सद्गुरु आणि परात्पर गुरुदेवही सतत इतरांचा विचार करतात; म्हणून त्यांना शाश्वत आनंद प्राप्त होतो. आपणही तो आनंद अनुभवण्यासाठी सतत इतरांचा विचार करूया.’’
२ इ. प्रत्येक कृती देवाला अपेक्षित अशी व्हायला हवी : एकदा दैवी सत्संगात ‘प्रामाणिकपणा आणि व्यष्टी साधनेविषयीचे गांभीर्य’ यांवर एक विषय घेतला होता. त्या वेळी एका साधकाने सांगितले, ‘‘माझे प्रयत्न अल्प होतात. त्यामुळे ते आढाव्यात सांगायला माझी प्रतिमा आड येते.’’ तेव्हा प्रार्थनाने त्या साधकाला सांगितले, ‘‘माझे प्रयत्न ऐकून ‘साधकांना काय वाटेल ?’, यापेक्षा ‘देवाला काय वाटेल ?’, असा विचार करायला हवा.’’
२ ई. प्रांजळपणा : एका साधिकेने सांगितले, ‘‘माझ्यात प्रांजळपणा येतच नाही.’’ त्या वेळी प्रार्थनाने तिला सांगितले, ‘‘परात्पर गुरुदेवांच्या जवळ जाण्याची ओढ असली, तर आपल्यात आपोआप प्रांजळपणा येतो.’’ तिचे बोलणे ऐकून सर्वांचे मनोमन चिंतन होऊ लागले.
३. परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणे
३ अ. प्रवास करतांनाही सेवा करणे : एकदा प्रार्थना प्रवासात होती. त्या वेळी तिच्या समवेत माझी एक सेवा होती; म्हणून मी तिला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘तुला आज वेळ नसेल, तर आपण उद्या सेवा करू.’’ त्या वेळी तिने भ्रमणभाषवर सेवा परिपूर्ण केली. तेव्हा तिच्यातील ‘सेवेची तीव्र तळमळ आणि सेवेप्रतीचा भाव’ हे गुण माझ्या लक्षात आले. ‘आपण कुठेही असलो, तरी सेवेत खंड पडायला नको’, हे मला शिकायला मिळाले.
३ आ. प्रत्येक सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनुभवणे : ती कोणत्याच सेवांमध्ये भेद करत नाही. कोणतीही सेवा असली, तरीही ‘ती गुरुदेवांचीच सेवा आहे’, असा तिचा भाव असतो. तिच्याकडे झाडांना पाणी घालणे आणि सत्संग घेणे, अशा दोन्ही सेवा असतात. ती दोन्ही सेवा करतांना परात्पर गुरुदेवांना अनुभवत असते. ती गुरुदेवांचे स्मरण केल्याविना कोणतीच कृती करत नाही. प्रत्येक वेळी ‘गुरुदेवांना काय आवडेल ? मी त्यांच्या चरणी लवकरात लवकर कशी जाईन ?’, असा तिचा विचार असतो.
४. बालसाधिकेला सहज आणि सोप्या शब्दांत ‘स्वभावदोष म्हणजे काय ?’, हे समजावून सांगणे
प्रार्थना नेहमी इतरांना समजून घेते. दैवी सत्संगातील ६ वर्षांच्या एक दैवी बालिकेला ‘स्वभावदोष म्हणजे काय ?’, हे समजत नव्हते. त्या वेळी प्रार्थनाने तिला एकदम सोप्या शब्दांत समजावून सांगितले, ‘‘तुझ्याकडून कधी कधी अशा काही अयोग्य कृती होतात, ज्यामुळे इतरांना आणि तुलाही त्याचा त्रास होतो, उदाहरणार्थ कधी कधी आपण उशिरा उठतो, आईने सांगितलेले ऐकत नाही, खण व्यवस्थित ठेवत नाही, अशा प्रकारच्या अनेक चुका आपण करत असतो. या सर्व चुका आपल्या स्वभावातील दोषांमुळे स्वतःकडून होत असतात !’’ हे ऐकून मी थक्कच झाले. ‘प्रार्थना केवळ ११ वर्षांची आहे, तरीही तिला अन्य साधकांना किती सहज आणि सोप्या भाषेत समजावता येते’, याचे मला आश्चर्य वाटले.
५. अल्प अहं
एकदा आम्ही दोघी बोलत असतांना मी तिला सहज म्हणाले, ‘‘प्रार्थना, तू लवकरच संत होशील ना ! तेव्हा मी तुला ‘पू. प्रार्थना’ असे म्हणीन.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी संत झाले, तरी मी स्वतःला ‘गुरुदेवांची शिष्या प्रार्थना’ असेच म्हणीन.’’ तिचे बोलणे ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि ‘तिच्यात अहं किती अल्प आहे’, हे मला शिकायला मिळाले.
६. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, तुमच्याच कृपेमुळे मला प्रार्थनासारखी सहसाधिका लाभली. मला तिच्याकडून ‘अंतर्मुखता, सेवेची तीव्र तळमळ, इतरांचा विचार करणे, प्रेमभाव’, यांसारखे अनेक गुण शिकायला मिळाले. कु. प्रार्थनाप्रमाणेच मलाही तुमच्याप्रतीच्या भावात वृद्धी करता येऊ दे आणि तिच्याकडून पुष्कळ शिकता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’
– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
संपादकीय भूमिकाकोणतीही सेवा असली, तरी तिच्यात भेद न करता ‘ती गुरुदेवांचीच सेवा आहे’, असा भाव हवा ! |