प्रेमळ, सहनशील आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. भक्ती गुरुदास खंडेपारकर (वय ४४ वर्षे) !
आषाढ शुक्ल सप्तमी (६.७.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणाऱ्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. भक्ती गुरुदास खंडेपारकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. भक्ती गुरुदास खंडेपारकर यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रेमभाव
‘माझे सौ. भक्तीताईशी क्वचितच अनौपचारिक बोलणे झाले, तरीही मला तिचा आधार वाटतो. ‘तिच्याकडून प्रेमभावाची स्पंदने प्रक्षेपित होतात’, असे मला जाणवते.
२. उत्तम निर्णयक्षमता
ताईकडे कोणतीही अडचण मांडली, तरी ती त्यावर लगेच उपाययोजना सांगते. तिने सांगितल्याप्रमाणे उपाययोजना केल्यावर लक्षात येते की, तिने दिलेला निर्णय योग्य आहे.
३. पथ्य काटेकोरपणे पाळणे
ताईला प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही पथ्ये सांगितली आहेत. ताई पथ्य काटेकोरपणे पाळते. त्यात तिने कधीच सवलत घेतली नाही. खाण्याविषयी तिची आवड-नावड नाही.
४. सहनशीलता
मागच्या वर्षी ताईची प्रकृती बिघडली होती. तिला पोटात तीव्र वेदना व्हायच्या. असे काही मास चालू होते; परंतु त्या वेदनांचा लवलेशही ताईच्या तोंडवळ्यावर दिसत नव्हता. साधारणतः प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्यक्तीची चिडचिड होते किंवा तिला कंटाळा येतो; पण ताईच्या संदर्भात असे काहीच झाले नाही. तिच्याकडे बघून ‘ती आजारी आहे’, असे मला वाटत नव्हते.
५. साधिकेला साधनेत साहाय्य करणे
ताईने एकदा माझ्याकडून झालेल्या चुकांविषयी मला सांगितले. तेव्हा तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतर्मनात जात होता. ‘ताई जरी माझ्या चुकांविषयी सांगत होती, तरी तिचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटत होते. तिच्या बोलण्यामुळे माझी वृत्ती अंतर्मुख झाली.
६. ताईच्या वागण्या-बोलण्यात कुठेही अहं जाणवत नाही.
७. गुरुसेवेची तीव्र तळमळ
अ. एकदा मी तिला एका ग्रंथातील आकृतीविषयी काही शंका विचारल्या. दुसऱ्याच दिवशी तिने मला त्याविषयीची संपूर्ण माहिती सांगितली.
आ. मागच्या वर्षी काही मास ताईची प्रकृती बरी नव्हती. तिला अनेक वेळा रुग्णालयात जावे लागायचे; पण याचा परिणाम तिच्या सेवांवर झाला नाही. त्याही स्थितीत ती तळमळीने सेवा करत होती.
८. परात्पर गुरुदेवांप्रतीचा भाव
एकदा पायाच्या दुखण्यामुळे आधुनिक वैद्यांनी ‘अधिक चालू नकोस’, असे मला सांगितले होते. मला खोलीत बसून कंटाळा आल्याने मी १० मिनिटे चालले आणि माझा पाय दुखू लागला. त्याच दिवशी ताईने माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा मी तिला वरील प्रसंग सांगितला. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘चालावेसे वाटले की, सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांच्या खोलीत जायचे आणि तिथे चालायचे.’’ यावरून ‘ताई सतत भावस्थितीत असते’, हे माझ्या लक्षात आले.
‘हे गुरुमाऊली, ‘आपल्या कृपेमुळेच मला भक्तीताईचा सहवास लाभला आहे’, याविषयी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘ताईमधील गुण आम्हा सर्व साधकांना आत्मसात करता येऊ देत आणि तिची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी आर्त प्रार्थना आहे.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |