मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्य यांचे त्यागपत्र !

बंडखोरांना मोठे करून मी पापाची फळे भोगत आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई, २९ जून (वार्ता.) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्याचे त्यागपत्र दिले. ‘मी पुन्हा येईन’, असे कधी म्हणालो नव्हतो. मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. मला बहुमत चाचणीचा खेळ खेळायचा नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच दगा दिला. बंडखोरांना काही कमी न करता त्यांना मोठे करून मी पापाची फळे भोगत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सर्वाेच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारची बहुमताला विरोध दर्शवणारी याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित रात्री ९.३० वाजता फेसबूकद्वारे जनतेशी संवाद साधतांना स्वतःच्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधतांना म्हणाले की, अनेक आव्हाने आली आपण ती पार केली, न्यायदेवतेचा जो निकाल लागला, तो आम्हाला मान्य आहे. त्यांचा निकाल मान्य करायलाच हवा. त्यांनीही तातडीने बहुमत चाचणी करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले. राज्यपालांनी लोकशाहीचा मान राखला. तातडीने २४ घंट्यांच्या आत बहुमत चाचणी करायला लावली; पण दीड वर्ष विधान परिषदेच्या १२ आमदारांची सूची लटकवून ठेवली आहे. त्या सूचीप्रमाणे आमदारांची निवड करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, आता पुढची वाटचाल तुमच्या साथीने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला निधी देत कामाचा प्रारंभ केला. माझे आयुष्य सार्थकी लागले आहे; कारण शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे ‘औरंगाबाद’चे नाव संभाजीनगर केले आहे. ‘उस्मानाबाद’चे नाव धाराशिव केले आहे. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्‍यांचे आभार मानतो. काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे सहकार्य केले. ज्यांचा विरोध होता, त्यांनीच यासाठी साथ दिली. मी मातोश्री येथे राहून नवीन तरुण आणि तरुणी यांच्या साहाय्याने शिवसेना उभी करीन. अनेक तरुणांना संधी दिली जाईल. ३० जूनला शिवसैनिकांनी शांत रहावे. कोणताही अनुचित प्रकार करू नये. जे गुलाल उधळतील, त्यांना उधळू द्या. त्यांच्याकडे शिवसैनिकांनी लक्ष न देता शांत राहिले पाहिजे, असे सांगून त्यांनी शिवसैनिकांना पोलिसांनी नोटिसा दिल्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली.