पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची माहिती
सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि संपूर्ण पालखी मार्गावर ४ सहस्रांहून अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे. ३० जून ते १० जुलै या कालावधीत पंढरपूर आणि पालखी मार्गावरील संपूर्ण परिसरात वाहतूक मार्गात पालट असणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या पालख्यांचे आगमन ४ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यात होत आहे. त्या वेळी प्रत्येक पालखीसमवेत महिला पोलिसांचे निर्भया पथक असेल. विसाव्याच्या प्रत्येक ठिकाणी पोलीस साहाय्य केंद्र असेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर कुठे विसावा आहे ? कुठे पोलिसांचे नियोजन आहे ? वाहतूक मार्गात कोणता पालट आहे ? याची संपूर्ण माहिती सामाजिक प्रसारमाध्यमांवर पोलीस संदेशाद्वारे देत आहेत. वारीच्या निमित्ताने एकूण ८५ ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्यात येणार असून त्यांतील २५ ‘सीसीटीव्ही’ लावून झाले आहेत. पोलीस बंदोबस्तासाठी पंढरपूर शहरातील ग्राम सुरक्षा दल आणि स्वयंसेवक यांचेही साहाय्य घेण्यात येणार आहे, असेही तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.