सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या खोलीविषयी कु. पूनम चौधरी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या खोलीत गेल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी राहिलेल्या खोलीत जसा आनंद अनुभवायला मिळतो, तसाच आनंद मला सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांच्या खोलीत गेल्यावर अनुभवायला मिळतो.

आ. खोलीत गेल्यानंतर खोलीतील चैतन्यामुळे मनातील भय दूर होऊन उत्साह वाढतो आणि सहजता येते.

२. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खोलीकडून मिळालेले मार्गदर्शन

कु. पूनम चौधरी

२ अ. ‘भगवंताचे सतत स्मरण करून परीक्षित राजाप्रमाणे स्वतःचे कल्याण करून घे’, असे खोलीने सुचवणे : जुलै २०२१ मध्ये एकदा सद्गुरु डॉ. पिंगळेकाका गोवा येथे गेले होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘गुरुपौर्णिमेला आता थोडेच दिवस शेष राहिले आहेत; पण ‘गुरुपौर्णिमेसाठी कोणते प्रयत्न करावेत ?’, हे अजूनही माझ्या लक्षात येत नाही.’ या विचारामुळे माझे मन अस्वस्थ झाले होते. सहज माझे लक्ष सद्गुरु पिंगळेकाकांच्या खोलीकडे गेले. तेव्हा ती खोली मला म्हणाली, ‘ज्याप्रमाणे परीक्षित राजाने मृत्यूपूर्वी ७ दिवस तळमळीने भगवंताचे सतत स्मरण करून स्वतःचे कल्याण करून घेतले, तसेच प्रयत्न तू कर.’

२ आ. खोलीने कृतज्ञतेचे प्रसंग पुनःपुन्हा लक्षात आणून दिल्यामुळे सतत भावस्थितीत रहाता येणे : मला शारीरिक त्रास होत असतांना सद्गुरु पिंगळेकाकांच्या खोलीकडून मला सतत मार्गदर्शन मिळत होते. त्यांची खोली कृतज्ञतेचे प्रसंग पुनःपुन्हा माझ्या लक्षात आणून देत होती. त्यामुळे संपूर्ण दिवसभर माझी भावजागृती होऊन मला कृतज्ञता वाटत होती.

२ इ. खोलीत न जाताही तिचे निर्गुणातून चैतन्य आणि मार्गदर्शन मिळणे : पूर्वी ‘सद्गुरु पिंगळेकाकांच्या चैतन्याचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्या खोलीत जावे’, अशी माझ्या मनात इच्छा असायची. आता मला निर्गुणातूनच खोलीचे चैतन्य आणि मार्गदर्शन मिळत असल्यामुळे ती इच्छाच उरली नाही.

३. सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांच्या खोलीविषयी आलेल्या अनुभूती

अ. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला पुष्कळ दिवसांपासून सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांच्या खोलीत कधी फिकट गुलाबी रंगाचा, तर कधी सोनेरी रंगाचा प्रकाश दिसतो.

आ. ‘सद्गुरु पिंगळेकाकांच्या खोलीच्या दारात गुरुदेव उभे असून खोलीमध्ये माता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि माता श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसते.

इ. मला खोलीच्या भिंतींकडे पाहून उत्साह वाटतो आणि तेथे सद्गुरु काकांचे दर्शन होते.

ई. ‘सद्गुरु पिंगळेकाकांच्या खोलीकडून आज मला इतके मार्गदर्शन कसे मिळत आहे ?’, अशी जिज्ञासा माझ्या मनात निर्माण झाली. तेव्हा खोली मला म्हणाली, ‘सद्गुरु काका, आपल्या निर्गुण तत्त्वाचा मला लाभ मिळू दे’, अशी तूच सद्गुरु पिंगळेकाकांना प्रार्थना केली होतीस ना ? तुला त्या तत्त्वाचा लाभ मिळवून देण्याचे दायित्व माझेच आहे.’

साक्षात् ब्रह्मांडनायक परात्पर गुरुदेवांच्या खोलीमध्ये जशा अनुभूती येतात, तशाच अनुभूती मला सद्गुरु पिंगळेकाकांमधील चैतन्य आणि त्यांचे अस्तित्व यांमुळे येतात. मी त्यांच्या श्रीचरणी या अनुभूती अर्पण करते आणि त्यांच्या खोलीला भावपूर्ण वंदन करते.

– कु. पूनम चौधरी, देहली (१५.७.२०२१)

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

४.७.२०२१ या दिवशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधनेविषयीची पुढील अनमोल सूत्रे भाववृद्धी सत्संगात सांगितली.

१. आदर्श साधक कुणाला म्हणावे ?

कु. मनीषा माहुर

जे साधक ईश्वरप्राप्तीच्या ध्येयासाठी मायेचा त्याग करायला सिद्ध आहेत, स्थुलातून शरीर अर्पण करत आहेत, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून मन समर्पित करण्याचा प्रयत्न करत आहेत, दुर्बुद्धीचा त्याग करून स्वतःचे तन, मन, बुद्धी अन् अहं अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते ‘आदर्श साधक’ आहेत.

२. साधना कुणाची होते ?

जे साधक ध्येय निश्चित करून स्वतःकडून झालेल्या चुका स्वीकारतात, स्वतःच्या चुका लक्षात आल्यावर इतरांचे साहाय्य घेतात आणि इतरांच्या चुका लक्षात आल्यावर त्यांनाही साहाय्य करतात, त्या साधकांची साधना होत असते.

३. आपले मन हेच अनुसंधानाचे माध्यम आहे. मनच आपल्याला मायेमध्ये अडकवून ठेवते आणि मनच ईश्वरप्राप्तीच्या दिशेने घेऊन जाते.

४. चांगले विचार ईश्वरच देऊ शकतो.

५. आम्हाला गुरुचरणी घेऊन जाण्यासाठी देवीदेवताच येत असतात.

संकलक : कु. मनीषा माहूर, देहली (१४.७.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक