राजकीय अस्थिरतेच्या काळात ५ दिवसांत सहस्रो कोटी रुपयांचे अध्यादेश !

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वाधिक शासकीय अध्यादेश !

मुंबई – महाराष्ट्रात राजकीय अस्थिरतेच्या काळात केवळ ५ दिवसांत सहस्रोे कोटी रुपयांचे अध्यादेश (सरकारी आदेश) निघाले आहेत. या ५ दिवसांत २८० अध्यादेश निघाले आहेत. सर्वाधिक आदेश हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असलेल्या विभागांनी काढल्याची माहिती समोर आली आहे. २१ जूनला ८१, २२ जूनला ५४, २३ जूनला ५७ आणि २४ जूनला ५८ सरकारी अध्यादेश काढण्यात आले आहेत.

यास भाजपने विरोध दर्शवला आहे. अल्पमतात दिसणार्‍या उद्धव ठाकरे सरकारकडून बिनदिक्कतपणे काढण्यात येणार्‍या अध्यादेशांचा आढावा घेऊन त्यांवर बंदी घालण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. २१ आणि २२ जून या २ दिवसांत १३५ शासकीय अध्यादेश काढण्यात आले आहेत. यात सर्वाधिक आदेश पाणीपुरवठा आणि जलसंधारण विभागाचे आहेत. एका दिवसाच्या कामाचे ८ घंटे गृहित धरले, तर प्रत्येक नवव्या मिनिटाला एक शासकीय आदेश निघाला आहे.