इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणार्‍या मुलींना अटक !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

(प्रतिकात्मक चित्र)

तेहरान – शिराज शहरात ‘स्केटबोर्डिंग’ क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आला होता. या क्रीडा प्रकारामध्ये एका लाकडी फळीला चाके लावून खेळाडू त्यावर उभे राहून पुढे सरकत जातो. या खेळाच्या वेळी अनेक अल्पवयीन मुली आणि महिला उपस्थित होत्या. या वेळी हिजाब न घालणार्‍या मुली आणि महिला यांना तेथील पोलिसांनी अटक केली. इराणमध्ये मुली आणि महिला यांना हिजाब घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले.

या कारवाईच्या संदर्भात शिराज राज्याचे पोलीस प्रमुख फराज सोजे म्हणाले, ‘‘कार्यक्रम झाल्यावर अनेक महिला आणि मुली यांनी हिजाब काढला. कोणताही खेळ अथवा क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करतांना धार्मिक नियमांचे पालन करणे अपरिहार्य आहे. त्याचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.’’

संपादकीय भूमिका

कुठे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणारा इराण, तर कुठे सार्वजनिक ठिकाणी धर्मपालन करणार्‍या हिंदूंना विरोध करणारे भारतातील पुरो(अधो)गामी !