सौ. सुनंदा जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) या सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या पत्नी आहेत. त्या रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतात. त्यांनी सद्गुरु जाधवकाकांना व्यवहार आणि साधना यांत मोलाची साथ दिली. त्यांनी अनेक प्रसंगांत गुरुकृपा अनुभवली. या लेखात आपण ‘सौ. सुनंदा जाधव यांच्या साधनेचा आरंभ आणि त्यांना सेवेतून मिळालेला आनंद’ यांविषयी जाणून घेऊया.
१. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ
१ अ. सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवचनात नामस्मरणाचे महत्त्व लक्षात येणे आणि त्याविषयी कुटुंबियांना सांगणे : ‘ऑगस्ट १९९९ मध्ये अकलूज, जिल्हा सोलापूर येथील ‘सदाशिवराव माने विद्यालय’ येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन होते. मी आमच्या शेजारच्या काकूंच्या समवेत प्रवचनाला गेले होते. त्या प्रवचनात ‘नामस्मरणाचे महत्त्व, तसेच कुलदेवी आणि श्री गुरुदेव दत्त यांचे नामस्मरण का करायचे ?’, याविषयी सांगितले. त्या वेळी मला साधनेविषयी समजले. मी घरी आल्यावर सत्संगात सांगितलेली सूत्रे, उदा. कुलदेवतेच्या नामस्मरणामुळे आपली आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती होते, याविषयी कुटुंबातील सर्वांना सांगत असे.
१ आ. यजमान (सद्गुरु नंदकुमार जाधव) सनातनच्या अभ्यासवर्गाला आल्यावर त्यांना सत्संगात शिकवलेला ‘मनाचे कार्य कसे चालते ?’, हा विषय आवडल्याने ते नियमितपणे सत्संगाला येऊ लागणे : एकदा पुणे येथील आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी यांचा अकलूज येथे अभ्यासवर्ग होता. तेव्हा मी माझ्या यजमानांना (सद्गुरु नंदकुमार जाधव यांना) म्हणाले, ‘‘आज अभ्यासवर्ग आहे. तुम्ही येता का ? तुम्हाला आवडले, तर तिथे बसा. तुम्ही तेथून निघून आलात, तरी तुम्हाला कोणी काहीही म्हणणार नाही.’’ त्या वेळी यजमान माझ्या समवेत आले. यजमानांना अभ्यासवर्गात सांगितलेला ‘मनाचे कार्य कसे चालते ?’ हा विषय फार आवडला. ते विज्ञान शाखेतील पदवीधर (बी.एस्.सी. बी.एड्.) असल्याने तो विषय त्यांच्या बुद्धीला पटला. पुढील आठवड्यापासून तेही सत्संगाला येऊ लागले. तेव्हा सत्संग घेण्यासाठी वालचंदनगर येथून श्री. धीरज केसकर आणि श्री. अतुल गोडसे येत असत.
१ इ. सनातन संस्थेच्या सत्संगात आनंद मिळणे : सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यापूर्वी मी एका परिवारामध्ये सत्संगाला जात होते; परंतु मला तिथे आनंद मिळत नव्हता. सनातनच्या सत्संगात जाऊ लागल्यावर मला आनंद मिळू लागला.
२. सेवेतून आनंद मिळणे
२ अ. पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या दिवशी असलेल्या वारीनिमित्त साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्याची सेवा करणे आणि त्यातून शब्दातीत आनंद मिळणे : पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या दिवशी असलेल्या वारीनिमित्त आम्ही (मी आणि यजमान) साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करत होतो. आम्ही साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे अंक घेऊन मार्गावर उभे होतो. त्या वेळी आमच्याकडून एकाच अंकाचे वितरण झाले; पण तेथे उभे रहाण्याने जो आनंद मिळाला, तो शब्दातीत होता. मला आतून चांगले वाटत होते.
२ आ. पू. (सौ.) संगीता जाधव वैयक्तिक संपर्क करण्यासाठी अकलूज येथे जातांना मला त्यांच्या समवेत नेत असत.
२ इ. यजमानांच्या समवेत संपर्काला जाणे आणि ते घेत असलेल्या सत्संगात सेवा करणे : काही दिवसांत अकलूज येथील साधक सद्गुरु जाधवकाका, पू. (सौ.) संगीता जाधव आणि श्री. विष्णुपंत जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हे सत्संग घेण्यास सिद्ध झाले. त्यांच्या अकलूज येथे प्रसार करणे, ग्रंथांचा वितरणकक्ष लावणे आणि प्रवचन घेणे, या सेवा चालू झाल्या. सद्गुरु जाधवकाका आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी २ गट केले. आम्ही वेगवेगळ्या भागांत जमायचो आणि गट करून सकाळी प्रसार करायचो अन् संध्याकाळी प्रवचन घ्यायचो. पुढे सत्संगांची संख्या वाढली. मी सद्गुरु जाधवकाकांच्या समवेत सत्संगाला जायचे. तिथे मी ग्रंथ, नामपट्ट्या, देवतांची चित्रे आणि सात्त्विक उत्पादने यांचा वितरणकक्ष लावत असे. मी सत्संगाच्या ठिकाणी सर्वांच्या चपला व्यवस्थित लावून ठेवत असे. अन्य वेळी मी सद्गुरु काकांच्या समवेत वैयक्तिक संपर्काला जात असे.
२ ई. घरी अभ्यासवर्ग चालू असतांना एकटीने स्वयंपाक करणे आणि त्या वेळी ‘कुणीतरी साहाय्य करत आहे’, असे वाटणे : त्या वेळी प्रत्येक मासाला आमच्याकडे श्री. दिलीप आठलेकरकाका येत असत. ते आमच्या घरी रात्री अभ्यासवर्ग घेत असत. आमच्या घरातील बैठककक्षात अभ्यासवर्ग होत असे. मी स्वयंपाकघरात ‘आवाज होणार नाही’, अशा रितीने स्वयंपाक करत असे. त्या वेळी ‘स्वयंपाक करतांना कुणीतरी साहाय्य करत आहे’, असे मला जाणवायचे.
२ उ. विविध उपक्रमांत सहभागी होणे आणि त्या सेवेतून आनंद मिळाल्याने पुढील सेवेचे दायित्व घेण्यासाठी उत्साह वाढणे : सद्गुरु काका सेवेसाठी परभणी येथे असतांना मीही सेवेसाठी तिकडे गेले. मी मानवत (परभणी) येथे सत्संग घेण्याची सेवा केली. सत्संगातील कुटुंबियांशी जवळीक होण्यासाठी सद्गुरु काका आणि मी सत्संगात येणाऱ्या साधकांच्या घरी संपर्काला जात होतो. त्यातून पुष्कळ साधक कृतीशील झाले.
एकदा मला शाळेच्या पटांगणात प्रवचन घेण्याची संधी मिळाली. प्रवचनाला शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. मला ‘गणपति’विषयी माहिती सांगायची होती. माझी त्याविषयी बोलण्याची क्षमता नव्हती. त्या वेळी ‘गुरुदेवच माझ्या तोंडून बोलले’, असे मला जाणवले. त्यानंतर मी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे सत्संग घेण्यास आरंभ केला. त्या सेवेमधून मला आनंद मिळत गेल्यामुळे पुढील सेवेचे दायित्व घेण्यासाठी माझा उत्साह वाढला.
२ ऊ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाचे दायित्व घेणे : मला गुरुदेवांच्या कृपेने हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाचे दायित्व घेता आले. सेवा झाल्यावर अहवाल करतांना पै-पैचा हिशोब जुळत असे. त्यामुळे मला त्या सेवेतून आनंदही मिळाला.
३. मुलींचा सेवेतील सहभाग
३ अ. अकलूज येथील विज्ञानयात्रेत लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत मुलींनीही सहभागी होणे : एकदा अकलूज येथे विज्ञानयात्रा होती. त्यात संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात येणार होते. त्यासाठी वालचंदनगर, सोलापूर आणि पुणे येथून साधक आले होते. पू. शिवाजी वटकरकाकाही आले होते. श्री. धीरज केसकर सेवेचे नियोजन पहात होते. ते साधकांना प्रेमाने सेवा समजावून सांगायचे. या सेवेत आमच्या मुलीही (कु. अनुराधा जाधव आणि आताच्या सौ. गायत्री शास्त्री) सहभागी होत्या. त्या दिवसापासून मुलींचा सेवेत सहभाग चालू झाला.
३ आ. ‘साधनेसाठी अधिकाधिक वेळ मिळावा’, यासाठी मुलींनी कला शाखेत शिक्षण घेणे आणि त्यानंतर पूर्णवेळ साधना करणे : मुली बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिकत होत्या; पण ‘अधिकाधिक साधना आणि सेवा करायला वेळ मिळावा’, यासाठी त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. त्या दोघीही बी.ए. (कला शाखेतील पदवी परीक्षा) उत्तीर्ण झाल्या. पुढे त्या पूर्णवेळ सेवा करू लागल्या.
४. अनुभूती
४ अ. नामस्मरण केल्यामुळे घर बांधण्यासाठी घेतलेले ऋण फेडण्यासाठी देवाने उपाय सुचवणे आणि तशी कृतीही देवाने करवून घेणे : मी ‘कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त’ यांचे नामस्मरण चालू केल्यावर मला व्यावहारिक अनुभूती आली. आम्ही घर बांधण्यासाठी एका पतसंस्थेकडून ऋण (कर्ज) घेतले होते. चक्रव्याढ व्याजामुळे ऋणाची रक्कम दुप्पट झाली होती. ‘त्याची परतफेड करणे, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च आणि घरखर्च’ यांमुळे मला ताण येत असे. मी नामस्मरण करत असल्याने ‘त्या ऋणाची रक्कम कशी परत करायची ?’, याविषयी देवाने मला सुचवले. मी फंडातील (बऱ्याच जणांनी प्रतिमास जमवलेल्या पैशांतून) पैसे काढून एक रकमी ऋणाची रक्कम भरली. देवानेच माझ्याकडून ही कृती करवून घेतली.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/591463.html
– सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |