‘सौ. सुनंदा जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) या सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या पत्नी आहेत. त्या रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतात. त्यांनी सद्गुरु जाधवकाकांना व्यवहार आणि साधना यांत मोलाची साथ दिली. त्यांनी अनेक प्रसंगांत गुरुकृपा अनुभवली. २४.६.२०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘सौ. सुनंदा जाधव यांच्या साधनेचा आरंभ आणि त्यांना सेवेतून मिळालेला आनंद’ यांविषयी जाणून घेतले. आज पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/591080.html
५. यजमानांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेणे
५ अ. यजमानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतांना देवाच्या कृपेने मनात शंका न येणे : यजमानांनी मला विचारले, ‘‘मी नोकरी सोडतो. मला प्रतिमास २ सहस्र ७०० रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे. तुला काय वाटते ?’’ त्या वेळी यजमान साधनेसाठीच स्वेच्छानिवृत्ती घेत होते. त्यामुळे माझ्या मनात देवाच्या कृपेने ‘का ? किंतु’, असे विचार आले नाहीत; कारण ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे आणि कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे’, हे सूत्र माझ्या मनावर बिंबले होते. वर्ष २००२ मध्ये यजमानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
५ आ. यजमानांनी नोकरीचे त्यागपत्र दिल्यावर सहकारी शिक्षकाने पुष्कळ बोलणे, तरीही ‘यजमान चांगले काम करत आहेत’; म्हणून त्याविषयी काहीच न वाटणे : यजमानांनी त्यांच्या शाळेच्या संस्थेच्या अध्यक्षांना त्यागपत्र लिहून दिले आणि ते सेवेसाठी परभणी येथे गेले. शाळेतील शिक्षकांना याविषयी समजल्यावर ते शिक्षक आमच्या घरी आले आणि मला म्हणाले, ‘‘तुम्ही श्री. जाधव यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी अनुमती कशी दिलीत ?’’ ते मला पुष्कळ बोलले; पण यजमान चांगले काम करत आहेत; म्हणून त्यांच्या बोलण्याचे मला काहीच वाटले नाही.
५ इ. निवृत्तीवेतनाचे पैसे मिळायला वेळ लागत असतांना गुरुदेवांनी साधकांच्या माध्यमातून साहाय्य करणे : मुलींचे शिक्षण चालू होते. यजमानांच्या निवृत्तीवेतनाचे पैसे मिळायला वेळ लागणार होता. तेव्हा गुरुदेव साधकांच्या माध्यमातून सर्व साहाय्य करत होते. आमच्या घराजवळच पोलीस वसाहत होती. तेथील ३ – ४ कुटुंबे सत्संगाशी जोडली होती. आमचे शेजारी आम्हाला भाजी अन् किराणा साहित्य आणून द्यायचे. आमच्या घरी दूध आणून देणारे काका मला सांगायचे, ‘‘तुमच्याकडे पैसे आल्यावर मला द्या.’’ ते मला जाता-येता ‘काही हवे का ?’, असे विचारत असत. ते त्यांच्या मुलांना आमच्या घरी पाठवायचे. ती मुले मला सेवेला जाण्यासाठी साहाय्य करत.
५ ई. यजमानांच्या निवृत्तीवेतनाची धारिका सिद्ध होतांना पुष्कळ अडथळे येणे; परंतु गुरुकृपेने कुणालाही पैसे न देता सर्व कामे होणे : यजमानांच्या निवृत्तीवेतनाची धारिका सिद्ध करण्याचे काम त्यांच्या शाळेतील एका शिक्षकाकडे होते. मला त्यांच्याकडे जावे लागे. मला या कामाविषयी काहीच ठाऊक नव्हते. मी त्यांच्याकडे जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘मी सेवा म्हणून शाळेत जात आहे. तुम्हीच ती सेवा माझ्याकडून करवून घ्या’, अशी प्रार्थना करत असे. त्या शिक्षकांना भेटून झाल्यावर मला तेथील एक शिक्षिका भेटायच्या. त्या मला म्हणायच्या, ‘‘काकांचे निवृत्त व्हायचे वय झाले आहे का ? त्यांनी मुलींच्या संदर्भातील सर्व कर्तव्ये पार पाडायला हवीत.’’ माझ्या समवेत गुरुदेव असल्याने मला त्यांच्या बोलण्याचे काहीच वाटत नसे. माझ्या मनाची स्थिती चांगली असायची. गुरुकृपेने निवृत्तीवेतनाची सर्व कागदपत्रे असलेली धारिका सिद्ध झाली. त्यानंतर यजमानांनी ती सर्व कागदपत्रे सोलापूर येथील कार्यालयात नेऊन दिली. तेथील कर्मचार्यांना या कामासाठी पैसे द्यावे लागायचे; मात्र गुरुदेवांच्या कृपेने एक पैसाही न देता आमचे काम झाले. (सर्वत्र भ्रष्टाचार कसा आहे?, हे या उदाहरणावरून लक्षात येते.)
६. यजमानांच्या निवृत्तीवेतनातून काही रक्कम अर्पण करणे
मला अर्पणाचे महत्त्व ठाऊक असल्याने यजमानांच्या निवृत्तीवेतनाचे पैसे मिळाल्यावर मी काही पैसे बाजूला काढून ते अर्पण करत असे. पुढे मी काही पैसे घरातील अर्पणपेटीत ठेवत असे आणि ते पैसे गुरुपौर्णिमेसाठी अर्पण करत असे.
– सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०२२)
(क्रमशः)