भाजपचे ५, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी २ अन् काँग्रेसचा १ उमेदवार विजयी !

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा महाविकास आघाडीला धक्का !

मुंबई – राज्यसभेप्रमाणेच शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत ५ उमेदवार निवडून आणले, तर शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला.

भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांनी बाजी मारली. शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पडवी विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. काँग्रेसकडून भाई जगताप विजयी झाले, तर चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास २१ मते फुटली. त्यात शिवसेनेची ३ मते इतरांनी पळवली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात ६ मते अतिरिक्त पडली. काँग्रेसची ३ मते फुटली आहेत. ४४ पैकी ४१ मते काँग्रेसला पडली.