VIDEO : स्वतः हिंदु धर्माचे आचरण केल्यासच हिंदूंना जागृत करणे शक्य ! – दयाल हरजानी, व्यावसायिक, हाँगकाँग

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुजागृतीच्या विविध माध्यमांविषयी जागृती

रामानथी (गोवा) – आपल्याला मूलत: आंतरिक प्रवास करून, म्हणजेच साधना करून धर्मकार्यासाठी सिद्ध व्हायला हवे. स्वतः हिंदु धर्माचे आचरण केल्यासच हिंदूंना जागृत करणे शक्य आहे, असे प्रतिपादन हाँगकाँग येथील व्यवसायिक श्री. दयाल हरजानी यांनी केले. रामनाथी येथे आयोजित करण्यात आलेल्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी (१७ जून २०२२ या दिवशी) ते बोलत होते.

दयाल हरजानी

श्री. हरजानी पुढे म्हणाले, ‘‘मंदिरांमध्ये दानपेटी असते; पण ज्ञानपेटी नाही. मंदिरात धर्माचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मंदिरांकडून ते दिले जात नाही. त्यामुळे आपल्याला मंदिरांतही परिवर्तन घडवून आणावे लागेल. धर्माचे ज्ञान घेऊन मनात मंदिर निर्माण झाले नाही, तर काहीच उपयोग नाही. यासाठी गुरुकुल परंपरेचे पुनरूज्जीवन होणे आवश्यक आहे. आपल्याला हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासह हिंदूंचे रक्षण करणेही आवश्यक आहे.’’

हिंदु धर्माच्या मूल्यांचा शास्त्रीय परिभाषेत प्रसार करणारे हाँगकाँग येथील दयाल हरजानी !

श्री. दयाल हरजानी म्हणाले की, हिंदु धर्माच्या मूल्यांचा शास्त्रीय परिभाषेत प्रसार करण्यासाठी आम्ही प्रत्येक मासाच्या दुसर्‍या सोमवारी ऑनलाइन कार्यक्रम घेतो. आता आमच्या ‘यूट्यूब चॅनेल’चे ९० सहस्र सदस्य असून ते वाढत आहेत. ही मोठी शक्ती आहे. मला हिंदु जनजागती समितीशी सदैव संघटन ठेवायचे आहे. मी या धर्मकार्यासाठी स्वत:ला समर्पित करतो.

ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी उद्योजकांनी धर्मकार्यार्थ अर्पण करावे ! – रवींद्र प्रभुदेसाई, संचालक, पितांबरी उद्योगसमूह, ठाणे

मी जेव्हा पहिल्यांदा परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांना भेटलो, तेव्हा त्यांनी मला उद्योजक या शब्दाचा नेमका अर्थ समवून सांगितला. ‘उद्’ म्हणजे ‘आनंद’ आणि योजक’ म्हणजे मिळवणे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती जो घडवून आणतो तो खरा उद्योजक होय !

रवींद्र प्रभुदेसाई

त्याच अनुशंगाने पाहिल्यास जगातील सर्वांत मोठे उद्योजक हे परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले हेच आहेत. ते सर्वांना आनंद मिळण्यासाठी कार्यरत आहेत. मला मिळणार्‍या धनातील काही वाटा मी धर्मकार्य करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना अर्पण करण्यास प्रारंभ केला. यानंतर माझ्या आनंदात आणखी वाढ झाली. त्यामुळे ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी उद्योजकांनी धर्मकार्यार्थ अधिकाधिक अर्पण करावे, असे आवाहन पितांबरी उद्योगसमूहाचे संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

ऋषी-मुनींनी दिलेले ज्ञान युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ‘यू ट्यूब’वर ‘जंबू टॉक्स’वर धार्मिक कार्यक्रम घेतले ! – निधीश गोयल, संचालक, ‘जंबू टॉक्स, जयपूर, राजस्थान

यू ट्यूबवर ‘जंबू टॉक्स’ या कार्यक्रमाद्वारे धर्म आणि राष्ट्र यांविषयी चर्चा आयोजित करून मी आध्यत्मिक अनुभव घेतला आहे. देशातील ऋषी-मुनींनी आपल्याला दिलेले ज्ञान नवीन पिढीला होण्यासाठी आम्ही ‘जंबू टॉक्स’द्वारे रामायण, महाभारत आणि इतिहासाच्या दृष्टीकोनातून विविध विषयांवर ५०० हून अधिक कार्यक्रम घेतले. याला युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रश्नमंजुषेचे कार्यक्रम घेतल्याने युवकांची बौद्धीक क्षमता वाढली. ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल मांस पद्धती’ अशी इस्लामची विकृत माहिती समाजासमोर उघड केली.

निधीश गोयल

मोहनदास गांधी भारतात आल्यापासूनचा इतिहास आणि भारताचा वैभवशाली प्राचीन इतिहास यांची माहिती दिली. हे सर्व करत असतांना ईश्वराने मला सेवक म्हणून निवडले आहे, याची जाणीव झाली. ‘जंबू टॉक्स’ चालू केल्यापासून १ वर्षांतच आपण अडथळ्यांवर मात करत पुढे जात आहोत, याची जाणीव झाली.

तमिळनाडूतील हिंदुद्रोही सत्ताधिशांमुळे हिंदु धर्मावर आघात ! – पाला संतोष, अध्यक्ष, हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई, तंजावूर, तमिळनाडू

पाला संतोष

तमिळनाडूनतील हिंदुद्रोही शक्ती सत्तेत असल्यामुळे हिंदु धर्मावरील आघात वाढले आहेत. ख्रिस्ती मिशनरी शाळा चालवण्याच्या नावाखाली धर्मातर करत आहेत. चर्चच्या माध्यमांतूनही असे प्रकार चालत आहेत. विकासाच्या नावाखाली तामिळनाडूतील प्राचीन मंदिरे पाडली जात आहेत. या सर्व समस्यांचे मूळ कारण अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन हे आहे. हे आघात रोखण्यासाठी आम्ही संघटितपणे कार्य करत आहोत, असे श्री. संतोष पाला यांनी सांगितले. ‘तमिळनाडूमध्ये हिंदूंच्या जागृतीसाठी केलेले कार्य’ या विषयावर ते बोलत होते.

धर्मासाठी समर्पित होऊन कार्य कसे करावे ?, हे अधिवेशनात शिकायला मिळाले !

वर्ष २०१४ पासून मी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात येत आहे. धर्मासाठी समर्पित होऊन आणि संघटित होऊन कार्य कसे करावे, हे समजले. यासाठी मी हिंदु जनजागृती समितीचा आभारी आहे, असे श्री. संतोष पाला यांनी म्हटले.

ग्राहक जागृत झाल्यास औषधांद्वारे होणारी लूटमार रोखणे शक्य ! – श्री. पुरुषोत्तम सोमाणी, अध्यक्ष, दी निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडिस्ट्री, तेलंगाणा

‘औषधांच्या मूळ किंमती आणि त्याद्वारे होणारी लूटमार तथा सामूहिक प्रयत्न’ या विषयावर बोलतानां श्री. पुरुषोत्तम सोमाणी म्हणाले की, ग्राहक जागृत झाल्यास औषधांद्वारे होणारी लूटमार रोखणे शक्य आहे. आजच्या काळात बाजारातील औषधांची निर्मिती करणारी आस्थापने आणि औषधविक्री यांवर नियंत्रण नसल्याने औषधांची मनमानी पद्धतीने विक्री केली जात आहे. आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) सांगण्यानुसारच औषध निर्मिती करणारी आस्थापने जाणीवपूर्वक औषधांच्या किंमती वाढवतात. औषधांची दुकाने आणि रुग्णालये येथे ७० टक्के अधिक दर आकारून औषधांची विक्री केली जाते. मी अनेक लोकांना अल्प किंमतीत औषधे उपलब्ध करून दिली आहेत.

श्री. पुरुषोत्तम सोमाणी

औषधांच्या बेलगाम विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी मी पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार पंतप्रधानांनी कॅन्सर रोगाच्या औषधावर ‘ट्रेडमार्क’ आणल्याने या औषधांच्या किंमती आपोआपच अल्प झाल्या. कॅन्सरच्या ५२४ प्रकारच्या औषधांवर ‘ट्रेडमार्क’ आणले. त्यामुळे याचा २५ सहस्र कॅन्सरपीडित रुग्णांना लाभ झाला. यामुळे रुग्णांच्या पैशांची बचत झाली. ३ सहस्र रुपयांचे औषध १३० रुपये आणि ५ सहस्र रुपयांचे औषध ५०० रुपये, अशा मूळ किंमतीला लोकांना मिळू लागले. जेनेरिक औषधेही चांगली असतात, त्यांचा आपण वापर करू शकतो. ‘प्रधानमंत्री जनऔषधी दुकानां’तून औषध घेतल्यास आपणाला अगदी अल्प किंमतीत औषधे मिळू शकतात.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात प्रसारमाध्यमांचे योगदान मोठे ! – अभिषेक जोशी, अध्यक्ष, ओडिसा सुराख्य सेना, कटक, ओडिशा

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत प्रसारमाध्यमांचे योगदान’ या विषयावर बोलतांना ओडिशा येथील ‘ओडिशा सुराख्य सेना’चे अध्यक्ष श्री. अभिषेक जोशी म्हणाले की, लोकांचा संघर्ष आणि त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोचवण्याचे काम प्रसारमाध्यमे करत असतात. हे त्यांचे कर्तव्य आहे. मी वर्ष २०१६ पासून प्रसारमाध्यमाचे कार्य चालू केले. त्या माध्यमातून मी जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. काही जणांना वाटते की, सरकारचे साहाय्य असल्याविना आपण प्रसारमाध्यमाचे काम करू शकणार नाहीत; पण हा त्यांचा भ्रम आहे. मी प्रारंभी एक पत्रिका चालू केली. त्यामध्ये मनोरंजनाचा भाग ठेवला नाही. केवळ धर्म आणि संस्कृती यांची माहिती द्यायला प्रारंभ केला. भगवद्गीतेतील श्लोक अर्थासह प्रतिदिन देण्यास प्रारंभ केला. असे करतांना भगवान श्री जगन्नाथ आणि श्रीकृष्ण यांच्या आशीर्वादामुळे मला कधी अडचण आली नाही.

अभिषेक जोशी

प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून साम्यवाद्यांचा हिंदुद्रोही तोंडवळा समोर आणायला हवा. साम्यवाद्याचे खरे स्वरूप काय आहे ?, त्याविषयी हिंदूंची नेमकी भूमिका काय आहे ? आदींविषयीची माहिती प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. साम्यवादी आणि पुरोगामी यांचा उदोउदो करणार्‍या प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घालावा, तसेच त्यांना विज्ञापन देऊ नये. त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात प्रसारमाध्यमांचे योगदान मोठे आहे. धर्माचे पालन करणे, हे पत्रकार आणि संपादक यांचे कर्तव्य आहे. आपण कर्तव्य करत रहायचे, ईश्वर त्याचे फळ देईल. जेथे धर्म असतो तेथे विजय निश्चितच असतो. आपल्याला कुणी रोखू शकत नाही.

सामाजिक माध्यमांचा प्रभावी करून वापर करून हिंदु राष्ट्राचा प्रसार केला जात आहे ! – विश्वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती, राज्य समन्वयक, पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार

विश्वनाथ कुलकर्णी

अधिकाधिक हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे आणि हिंदूंवर होणारे आघात सर्वांसमोर यावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून वर्ष २०१६ मध्ये आम्ही ‘सामाजिक माध्यमां’द्वारे स्वतंत्र प्रसार चालू केला. याचा प्रारंभ केला, तेव्हा वर्ष २०१६ मध्ये आमच्याकडे केवळ १४९ कार्यकर्ते होते, तर आज २ सहस्र ६०० कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी प्रत्येक दिवशी ‘जागो’ संदेश १० लाख ६ सहस्र लोकांपर्यंत पोचत आहे. हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ www.hindujagruti.org प्रत्येक मासात १ लाख २० सहस्र लोक पहातात. ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या ऑनलाईन परिसंवादाचे आजपर्यंत १३५ हून अधिक भाग झाले असून ६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी ते पाहिले आहे. ‘ऑनलाईन पिटीशन’, विविध ‘ट्विटर ट्रेंड’, ‘ऑनलाईन आंदोलन’ करून हिंदूंमध्ये जागृती करण्यात आली. अशा प्रकारे सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करून हिंदु राष्ट्राचा प्रसार करण्यात येत आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी दिली. ते हिंदु जागृती समितीच्या वतीने ‘सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु राष्ट्राच्या विचारांचा प्रसार’ या विषयावर बोलत होते.

श्री. कुलकर्णी या वेळी पुढे म्हणाले की,

१. ‘वेबसिरीज’, विज्ञापन, मालिका यांद्वारे हिंदु देवता, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करण्यात येते. काही वेबसिरीजमध्ये भारतीय सैन्याचा अपमान करण्यात आला. या विरोधात समितीच्या वतीने ‘ऑनलाईन पिटीशन’ अभियान राबवण्यात आले. यामुळे ‘कोणताही चित्रपट आणि ‘वेबसिरीज’ यांमध्ये भारतीय सैन्याविषयी काही दाखवायचे असल्यास ‘सैन्याचे संमती पत्र’ घ्यावे लागेल’, असे घोषित करण्यात आले. सरकारलाही ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’लाही परिनिरीक्षण मंडळाच्या नियंत्रणाखाली आणावे लागले.

२. ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ने अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच एक विज्ञापन प्रसारित केले होते. त्यात अभिनेत्री करीना कपूर खान यांना कपाळावर विना टिकलीचे दाखवण्यात आले होते. याविरोधात #NoBindiNoBusiness या ‘हॅशटॅग’चा उपयोग करून एक ट्रेंड घेण्यात आला. याला संघटित हिंदूंनी विरोध केल्यावर ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ने करीना कपूर खान यांचे विज्ञापन मागे घेऊन अभिनेत्री तमन्ना भाटिया यांचे कपाळावर कुंकू असलेले विज्ञापन प्रसारित करावे लागले.

३. ‘गूगल प्ले स्टोअर’वर ‘रमी गणेश प्रो’ नावाचा पत्त्यांचा एक ऑनलाईन खेळ उपलब्ध करून दिला होता. यामुळे देवतांचा अनादर होत असल्याने सामाजिक माध्यमांद्वारे आम्ही विरोध केला. ट्विटर’द्वारे आम्ही मोहीम राबवली. यामुळे ‘गूगल प्ले स्टोअर’वरून हा खेळ मागे घ्यावे लागले.